फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 13 नवे गडी

विखे-पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षिरसागर, तानाजी सावंत यांच्यासह 8 जण कॅबिनेट मंत्री

– रिपाइंचे अविनाश महातेकर, भाजपचे योगेश सागससह 5 जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ

– विस्तारासाठी भाजपचे 10, शिवसेना 2 व रिपाइं 1 मंत्रिपदाचा फॉर्म्युला

मुंबई (प्रतिनिधी) – अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची असलेली उत्सुकता अखेर संपली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार 13 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. रविवारी राजभवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपने आयात केलेले राधाकृष्ण विखे-पाटील, मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे “घड्याळ’ उतरवून शिवसेनेत प्रवेश केलेले बीडचे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, विधान परिषदेवर निवडून आलेले शिवसेनेचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्यासह 8 जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. तर रिपाइंचे नेते डॉ. अविनाश महातेकर, भाजपचे योगेश सागर, संजय (बाळा) भेगडेंसह 5 जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

गेली साडेचार वर्षे रखडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार आज पार पडला. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होंईल, असे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जाहिर केले होते. पण या विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा केली होती. त्यानंतर शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीनिमित्त दिल्लीत असलेल्या फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे जाहीर केले होते.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. नव्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 13 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपाला 6 कॅबिनेट मंत्री व 4 राज्यमंत्री, शिवसेना 2 वैॅबिनेट मंत्रीपद, रिपाइंला 1 राज्यमंत्रीपद असा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता.

शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली. राजभवनाच्या प्रांगणात राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राज्यपालांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह राज्य प्रशानातील अधिकारी उपस्थित होते.
नव्या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला सर्वाधिक 5 मंत्रिपदे मिळाली असून, मुंबईला 3 मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. विदर्भातील भाजपचे डॉ. संजय कुटे (शेगाव), डॉ. अनिल बोंडे (अमरावती), अशोक उईके (यवतमाळ), शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत (यवतमाळ) यांना कॅबिनेट मंत्री, तर मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे नागपूरचे डॉ. परिणय फुके यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. मुंबईतून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट, तर कांदिवलीचे आमदार योगेश सागर, रिपाइंचे (आठवले गट) अविनाश महातेकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

मराठवाड्यातून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर (बीड) तसेच उत्तर महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील (अहमदनगर) यांना कॅबिनेट मंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश खाडे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय उर्फ बाळा भेगडे (मावळ) तसेच मराठवाड्यातील अतुल सावे (औरंगाबाद) यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे अनुपस्थित
राजभवनावर झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. उद्धव ठाकरे हे रविवारी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह आपल्या 18 खासदारांना घेऊन अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने ते शपथविधी सोहाळ्याला हजर राहिले नव्हते. मात्र, सेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री सोहाळ्यासाठी हजर होते.

शिवसेनेने मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील आमदारांना डावलले
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेकडून पश्‍चिम महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील आमदारांना संधी मिळेल अशी आशा होती. मात्र, ही आशा फोल ठरली आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे 6 आमदार आहेत. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे 2 खासदार जिंकून आले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, असे बोलले जात होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुखांनी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील आमदारांना डावलून विधान परिषदेवर निवडून आलेले तानाजी सावंत व राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले बीडचे जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपदाची बक्षिसी दिल्याने विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)