खेड -“शब्द दिला अन् तो पाळला नाही असं करतील ते रोहित पवार कसले?’ याचा प्रत्यय आता खेडकरांना अनुभवास आला आहे. त्यामुळे यानिमित्ताने अनेकांची नाराजीही दूर झाली. खेड येथे नव्या अद्ययावत ग्रामपंचायत इमारतीसाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून 20 लाखांचा निधी उपलब्ध झाला. मात्र, या तुटपुंज्या निधीत खेडकरांच्या स्वप्नातील अद्ययावत ग्रामपंचायत इमारत उभी करणे शक्य नव्हते.
गावातील सरपंच, नेते आणि काही कार्यकर्त्यांनी आ. रोहित पवारांना भेटून निधीची मागणी केली. एवढेच नव्हे तर गावातल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवात त्यांनी निधी देण्याचा शब्दही दिला. बघता बघता ग्रामपंचायत इमारत उभीही राहिली. मात्र, यात बराचसा कालावधीही उलटत गेला. आ. पवारांना दिलेल्या शब्दाचा विसर पडला की काय? म्हणत अनेकांनी नाराजीचा सूर आवळला.
अखेर आ. पवारांनी दिलेल्या शब्दाला जागत आपल्या स्थानिक आमदार निधीतून 12 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून सर्वांच्या प्रश्नावर उत्तर दिले आणि दिलेला शब्द पाळला. आता हा निधी इमारतीच्या वाढीव बांधकामासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सतीश मोरे यांनी दिली. या निधीतून राहिलेली कामे मार्गी लागून गावाच्या वैभवात भर पडणार आहे. याशिवाय नागरिकांची कामे मार्गी लागण्यास मोठी मदत होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे करणे शक्य होत आहे. स्थानिक आमदार निधीतूनही लवकरच आणखी सुशोभीकरणाची कामे मार्गी लागणार आहेत. ग्रामस्थांतर्फे ज्या मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा आ. पवार यांनी शब्द दिला आणि तो शब्द पाळलाही. त्याबद्दल समस्त ग्रामस्थांतर्फे आ. पवारांचे आभार मानतो, असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सतीश मोरे म्हणाले.