बेल्हे, (वार्ताहर) – बेल्हे बीटमधील सर्व शाळांचे कामकाज चांगले असून गुणवत्ता वाढीसाठी अधिक अधिक प्रयत्न करावेत. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं- 1 शाळेने या शैक्षणिक वर्षात 12 लाख 64 हजार रुपयांचा लोकसहभाग जमा केल्याबद्दल पंचायत समिती जुन्नरच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी विष्णू धोंगडे यांनी कौतुक केले.
जुन्नर तालुक्यातील बेल्हे नं. 1 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच बीटस्तरीय शिक्षण परिषद पार पडली. बेल्हे बीटमधील बेल्हे, निमगाव सावा, अणे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती जुन्नरच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी विष्णू धोंगडे यांनी उपस्थित राहून बीटमधील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत पुढील शैक्षणिक वर्षात करावयाच्या विविध शैक्षणिक कामांबद्दल मार्गदर्शन करून शाळेचे कौतुक केले.
केंद्रप्रमुख रत्नप्रभा वाकचौरे, सर्वश्री काळे, शौकत पटेल, सोपान बेलकर, सविता कुर्हाडे यांनी यावेळी सर्व शाळांच्या वार्षिक निकालपत्रक पुर्ततेची पाहणी करून मंजुरी दिली. मुख्याध्यापक मीरा बेलकर, उपशिक्षक हरिदास घोडे, संतोष डुकरे, कविता सहाणे, सुवर्णा गाढवे, प्रविणा नाईकवाडी, योगिता जाधव, अंजना चौरे यांनी शिक्षण परिषदचे नियोजन केले होते.