दहा वर्षांनंतर पदोन्नती; शिक्षक संघटनांच्या लढ्याला मिळाले यश
सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया दहा वर्षांपासून रखडली होती. याबाबत जिल्हा परिषद सभागृहातही सदस्यांनी वारंवार आवाज उठवला होता. विविध संघटनांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आले असून शुक्रवारी 117 शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली.
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने विविध संवर्गातील शिक्षकांची मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया 2010 पासून रखडली होती. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये सदस्यांनी वारंवार आवाज उठवला होता. पदोन्नती प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असल्यामुळे ही प्रक्रिया रेंगाळली होती. त्यामुळे मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त होती. शिक्षक संघटनांनीही याबाबत आवाज उठवला होता.
शुक्रवारी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी समुपदेशन घेण्यात आले. ज्येष्ठता यादीनुसार विविध संवर्गातील 117 शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती यावेळी देण्यात आली. स्क्रीनवर शाळांची नावे दाखवून शाळा निवडण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. यावेळी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी जाधव, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापकांची 249 पदे मंजूर होती. त्यापैकी 85 पदे भरण्यात आली होती. उर्वरित पदे रोस्टर व अन्य तांत्रिक अडचणींमुळे 2010 पासून रिक्त होती. शासनाने 117 मुख्याध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मुख्याध्यापकांची पदे भरण्यात आल्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारात आणखी सुसुत्रता येणार आहे.
प्रभावती कोळेकर, (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. सातारा)