जेजुरी – सर्वोच्च न्यायालयाने जमिनीबाबतच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वांत मोठा दिलासा श्री मार्तंड देवसंस्थान समितीला मिळाला आहे. शोध लागलेल्या 113 एकर जमिनींमधून मोठे उत्पन्न देवसंस्थानच्या तिजोरीत जमा होऊ शकते, त्यासाठी सध्य स्थितीत कसत असलेल्या वहिवाटदारांनी देवसंस्थानकडे संपर्क साधणे गरजेचे आहे.
मराठेकालीन व पेशवेकालीन राजे- महाराजे ,सरदार -इनामदार घराण्यांनी देवाच्या नावाने इनाम,सनद, म्हणून ज्या जमिनी देवसंस्थाने, मंदिरांचे व्यवस्थापन, दिवाबत्ती, पूजा, नैवेद्य व धार्मिक विधी, उत्सवांसाठी ज्या मानकरी व सेवेकरी यांना दिल्या होत्या. त्या जमिनी देवसंस्थानच्या मालकीच्या असून वहिवाटदारांचा काहीएक हक्क सांगता येणार नाही किंवा वहिवाटदारांना परस्पर विक्री करता येणार नाही.
देवालये, देवस्थाने किंवा देवसंस्थानची सेवा करत नसलेल्या वहिवाटदारांकडून ही जमीन काढून घेतली जाईल, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे मार्तंड देवसंस्थान समितीला दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांमध्ये जमिनी असल्याची माहिती उपलब्ध कागदपत्रांवरून देवसंस्थान समितीने मिळवली आहे. विश्वस्त शिवराज झगडे म्हणाले की, श्री खंडोबा देव, मार्तंड देव, मल्हारी देव, खंडेराव देव या नावे सुमारे 113 एकर जमीन देवसंस्थानची आहे. विशेष बाब म्हणजे खंडेरायाच्या नावे असलेल्या सर्व जमिनी बागायती क्षेत्रातील आहेत. यापैकी सणसर, सांगवी आणि पिसर्वे येथील जमिनी वगळता कोणतेही कागदपत्र अथवा माहिती देवसंस्थानकडे उपलब्ध नव्हती; परंतु माहिती अधिकार कायद्याचा वापर करीत इतरत्र असलेल्या जमिनींचा शोध लावत सर्व कागदपत्रे मिळवण्यात आली आहेत.
जे शेतकरी या जमिनी कसत आहेत ,त्यांनी कधीही देवसंस्थांनशी संपर्क केला नाही अथवा कोणत्याही स्वरूपात उत्पन्न दिलेले नाही. याबाबत पूर्वी तीन ठिकाणच्या जमिनी सोडल्या तर देवसंस्थांनकडेही कागदपत्रे उपलब्ध नव्हती.देवसंस्थानला या जमिनींचा शोध लागल्यानंतर सनद नाम्यासह सर्व कागदपत्रे मिळवत स्वातंत्र्य शेतीविभाग करण्यात आला आहे. तसेच सहधर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयात परिशिष्ठ 1 मध्ये नोंदीसाठी सर्व प्रकरणे पाठवण्यात आली आहेत. तर आढळून आलेल्या सर्व जमिनींची सरकारी मोजणी करण्या करता भूमीअभिलेख कार्यालयात मोजणीची रक्कम भरून अर्ज देण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
या आहेत जमिनी
सणसर (ता. इंदापूर) येथे गट न.146 मध्ये सुमारे 22 एकर जमीन देवसंस्थानच्या मालकीचे आहे; मात्र मागील काळातील दुर्लक्षामुळे सध्याचे वहिवाटदार देवसंस्थानला उत्पन्न देण्यास टाळाटाळ करत आहेत. तरंगवाडी (ता. इंदापूर) 14, सांगवी (ता. फलटण) येथे गट न.384मध्ये सुमारे 23, गिरवी (ता. फलटण) गट न. 1075 मध्ये सुमारे 12, देगाव (ता. सातारा) येथे गट न.1722 ते 1734मध्ये 13, लिंब (ता. सातारा) गट न.385 मध्ये 3, चाकण (ता. खेड) येथे गट न.2160मध्ये सुमारे 11, पिसर्वे (ता. पुरंदर) येथे गट न.953 मध्ये सुमारे 14 आदी सुमारे 113 एकर क्षेत्र जेजुरी देवसंस्थानच्या मालकीची व वहिवाटीची असून गांभीर्याची बाब म्हणजे गिरवी व सांगवी (ता. फलटण) येथील जमिनीची परस्पर खरेदी विक्री झाली आहे. तर काही जमिनींच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत.
“त्यांच्या’कडून प्रतिसाद नाही
जे शेतकरी पिढ्यांनपिढ्या जमिनी कसत आहेत त्यांच्याकडून निदान दरसाल उत्पन्न देवसंस्थानच्या तिजोरीत जमा व्हावे या उद्देशाने संबधित शेतकऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे; मात्र प्रतिसाद मिळत नाही. कोट्यवधी रुपयांच्या जमिनींचा मालक जेजुरीचा खंडेराया असला तरी सध्यातरी या जमिनींपासून कोणतेही उत्पन्न अथवा मोबदला मिळत नाही; मात्र पुढील कायदेशीर प्रक्रिया सध्याच्या विश्वस्त मंडळाकडून राबविण्यात येणार आहेत. याबाबत सहधर्मदाय आयुक्त यांचे मार्गदर्शन आणि सूचना घेण्यात येणार असल्याचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले.