न्युयॉर्क – न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्य्रु कुओमो यांनी तब्बल 11 महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली असून आता त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. खुद्द अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बायडेन यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना गव्हर्नरांनी राजीनामा दिला पाहिजे असा स्पष्ट अभिप्राय दिला आहे. न्युयॉर्क स्टेट ऍसेम्ब्लीत गव्हर्नरांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव चालवून त्यांना पदावरून हटवण्यात येऊ शकते. त्यांनी सहजी राजीनामा दिला नाहीं तर तसा प्रस्ताव त्यांच्या विरोधात चालवण्याची आता तयारी सुरू करण्यात आली आहे असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान गव्हर्नर कुओमो यांनी मात्र आपल्यावरील आरोप साफ फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की तपासात जे निष्पन्न झाल्याचा दावा केला गेला आहे तो खरा नाही. वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे. मी कोणत्याही महिलेला तिच्या संमतीशिवाय शिवलेलोही नाही असे त्यांनी म्हटले आहे.
डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनी आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या विरोधातील महभियोग प्रस्ताव फेटाळून लावावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे. आपण कदापिही राजीनामा देणार नाही असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. गव्हर्नरांच्या संबंधीतील ही चौकशी पाच महिने चालली होती. त्यात 11 महिलांनी गव्हर्नरांच्या विरोधात जबाब दिले आहेत.
त्यात त्यांनी म्हटले आहे की गव्हर्नर आपल्याला चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने सतत स्पर्श करीत असत आणि ते आमच्याशी आमच्या सेक्स विषयावर सतत बोलत असत. अन्यही महिलांनी त्यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले आहेत.
तथापि ते गव्हर्नरपदावर असल्याने त्यांच्या विरोधात तक्रारी करायला महिला धजावत नसत असेही काही महिलांनी चौकशीच्यावेळी नमूद केले आहे.