वाघोली, (प्रतिनिधी)-वाघोली-लोहगाव रोड परिसरात राहणार्या 29 वर्षीय कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणाला टेलिग्राम व व्हॉटसअॅपवर मेसेज करून ऑनलाइन पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून सुमारे 11 लाख 17 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अनोळखी इसमावर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाच्या व्हॉटसअॅपवर पार्टटाइम जॉबबाबत मेसेज करून गुगल मॅप 5 स्टार रेटिंग देण्याचे काम सांगितले. सुरुवातीला 5 स्टार रेटिंग दिल्यानंतर तरुणाच्या खात्यात 300 रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर टेलिग्राम अॅपवरील ग्रुपमध्ये क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग करण्यास सांगण्यात आले. तरुणाने प्रीपेड टास्क ट्रेडिंगसाठी 11 लाख 17 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात जमा केले.
भरलेले पैसे तरुणाने पुन्हा मागितले असता आणखी पैसे भरण्यास सांगितले. हा प्रकार फसवणुकीचा वाटल्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.