पुणे –इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी समुपदेशकांच्या नियुक्त्याही करण्यात आलेल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने माहिती दिली आहे.
परीक्षा कालावधी
इयत्ता बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहे. राज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळामार्फत परीक्षा होणार आहेत.
मोफत मार्गदर्शन
परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत हे समुपदेशक विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क मार्गदर्शन करणार आहेत.
उपक्रमाची गरज का?
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. या विद्यार्थ्यांना मदत करावीच लागणार आहे. यासाठी समुपदेशकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
योग्य तीच माहिती विचारा
विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आदींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.