महिनाभरात संख्या 377 वर सोसायट्यांत सर्वाधिक वाढ
पुणे – ज्या सोसायटीत 20 पेक्षा अधिक आणि ज्या इमारतीत 5 पेक्षा अधिक करोना बाधित आहेत, तेथे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले जात आहेत. या क्षेत्रांत दर आठवड्याला तब्बल 100 ने भर पडत असल्याचे मागील महिनाभरात समोर आले आहे. विशेषत: मोठ्या सोसायट्यांमध्ये ही स्थिती आहे. सीमा भिंतीसह प्रत्येकाची घरे प्रशस्त आणि मोठी असतानाही या साथीचा प्रसार सोसायट्यांमध्ये वेगाने होत आहे.
शुक्रवारअखेर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या सुमारे 377 झाली आहे. यात 169 इमारती तर 168 सोसायट्यांचा समावेश आहे. तर इतर 40 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. परिणामी रुग्णांना उपचारांसाठी बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्ण आढळलेला भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला जात आहे.
मागील दोन आठवड्यांपर्यंत या सोसायट्या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करताना आठवड्याला 30 ते 40 सोसायट्या वाढत होत्या. मात्र, आता दर आठवड्याला 100 नवीन प्रतिबंधित क्षेत्र तयार होत आहेत. अनेक सोसायट्यांत होम आयसोलेशन असलेले रुग्ण सर्रास फिरत असल्याच्या तक्रारी असल्या, तरी एवढ्या ठिकाणी लक्ष देण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही. त्यामुळे रुग्णवाढ सुरूच आहे.
संसर्ग वाढण्याचे कारण काय?
पहिल्या लाटेत प्रामुख्याने झोपडपट्ट्यांत सर्वाधिक करोनाबाधित सापडत होते. घर लहान असल्याने नागरिक स्वत: कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी जात होते. त्यावेळी बाधितांच्या शेजारील तसेच परिसरातील व्यक्ती कुटूंबाला आवश्यक साहित्य देत होते. तर प्रशासनही संपूर्ण भाग पत्रे ठोकून बंद करत होते. मात्र, सोसायट्यांत प्रत्येकाची घरे वेगळी आहेत. तसेच परिसरही बंदिस्त आहे. मात्र, त्यानंतरही साथ रोखण्यास अपयश येत आहे. येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव, मैदान सर्व असल्याने सोसायटीतील नागरिक त्याचा बिनधास्त वापर करतात. सोशल डिस्टन्स पाळले जात नाही.
एखाद्या घरात सगळेच बाधित असल्यास त्यांना कोणीही मदतीसाठी पुढे येत नाही. तसेच त्यांना कोणी मदत घेऊन आल्यास आत जाण्यास आडकाठी घातली जाते. परिणामी बाधितांच्या घरातील व्यक्ती बाहेर पडत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतरही वाद नको म्हणून सोसायटीचे पदाधिकारी अथवा इतर शेजारचे नागरिकही त्याला आक्षेप घेत नाहीत.