“कधी लसीकरण तर कधी दुसरं युद्ध…सरकारचं हे चाललंय काय?”

पी.चिदंबरम यांचा केंद्र सरकारला परखड सवाल

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या रुग्णवाढीचा आकडा हा रोज नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यातच सरकारकडून देशात लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. “केंद्र सरकार कधी लसीकरण मोहिमेला उत्सव म्हणतंय, तर दुसऱ्या दिवशी त्याला दुसरं युद्ध म्हणतंय. केंद्र सरकारचं हे चाललंय काय?”, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारला परखड सवाल केला आहे.

“आठवून पाहा, पंतप्रधानांनी सगळ्यात पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली, तेव्हा त्यांनी २१ दिवसांत हे युद्ध जिंकण्याचा दावा केला होता. त्याचं काय झालं?” असे देखील पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करून त्यांनी देशातील लसीकरण मोहीम आणि लसींचा तुटवडा यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही राज्यांकडून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे डोस अपुरे पडत असल्याची तक्रार केली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश होता. राज्याच्या काही भागांमध्ये लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण थांबवावं लागल्याचं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे केंद्र सरकारकडूनच लसीच्या पुरवठ्याचं योग्य नियोजन केलं जात नसल्याची टीका महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांनी केली होती. त्यावरून आता पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयी फक्त पोकळ दावे केले जात असल्याचं चिदंबरम यांनी ट्वीटमध्य म्हटलं आहे. “पहिल्या लॉकडाऊनची घोषणा करताना २१ दिवसांत करोनाविरोधातलं युद्ध जिंकण्याचा दावा पंतप्रधानांनी केला होता. महाभारतातलं युद्ध देखील १८ दिवसांत जिंकलं होतं. आता त्या युद्धाचं काय झालं? फक्त पोकळ दावे आणि मोठ्या वक्तव्यांनी करोनाविरोधातल्या लढ्याला यश मिळणार नाही. लसीकरणाच्या पुरवठ्यामध्ये आणि वितरणामध्ये आलेलं अपयश लपवण्याचा प्रयत्न सरकार करते आहे”, असं चिदंबरम म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.