– आशिष निनगुरकर
चित्रपटातील भाऊ-बहिणीचे प्रेम दाखवण्यासाठी “रक्षाबंधन’ हा सण खूपच आवश्यक आणि त्यामुळेच अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला रक्षाबंधनाची गाणी ऐकायला, पाहायला मिळतात. खास रक्षाबंधनानिमित्त चित्रपटातील रक्षाबंधनावर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
रक्षाबंधन हा संपूर्ण देशातील सगळ्यांचा आवडता सण. चित्रपट निर्मात्यांचा हा आवडता सण. त्यामुळेच काही चित्रपट बहीण-भावाच्या प्रेमावर आधारित आहेत तर काही चित्रपटांमध्ये भावा-बहिणीच्या प्रेमावर आधारित गाणीही आहेत. रक्षाबंधनाचे गाणे 1959 मध्ये प्रदर्शित, निर्माते एल. व्ही. प्रसाद यांच्या “छोटी बहन’ चित्रपटात दाखवण्यात आले होते. मोठा भाऊ बलराज साहनी आणि लहान बहीण नंदा यांच्यावर चित्रित “भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते आणि आजही आहे. गीतकार शैलेंद्र यांनी लिहिलेल्या या गाण्याला लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता.
निर्माता दिग्दर्शक ए. भीम सिंह यांनी 1962 मध्ये अशोककुमार आणि वहिदा रहमान यांना घेऊन “राखी’ चित्रपटाची निर्मिती केली होती, तर 1968 मध्ये त्यांनी सुनील दत्त आणि नूतनला घेऊन “भाई बहन’ चित्रपटाची निर्मिती केली होती. हे दोन्ही चित्रपट चांगले चालले होते. “अनपढ’ चित्रपटात “रंग बिरंगी राखी लेकर आई बहना’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे माला सिन्हावर चित्रित करण्यात आले आहे, तर “काजल’ चित्रपटात मीनाकुमारी यांच्यावर चित्रित केलेले, आशा भोसले यांनी गायलेले “मेरे भईया मेरे चंदा मेरे अनमोल रतन’ गाणे बहीण-भावाच्या प्रेमाची महती सांगणारे आहे. या चित्रपटाला संगीत रवी यांनी दिले आहे. बिमल रॉय यांच्या “बंदिनी’ चित्रपटात “अब के बरस भेज भईया को बाबुल सावन में दीजो बुलाय रे’ हे अत्यंत उत्कृष्ट गाणे आहे. हे गाणे आशा भोसले यांनी गायलेले आहे. तुरुंगात असलेली बहीण आपल्या भावाची आठवण काढतानाच्या या गीताचे बोल शैलेंद्र यांचे असून एस. डी. बर्मन यांनी संगीत दिलेले आहे.
देव आनंदने “हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटात भाऊ-बहिणीच्या प्रेमाची गाथा दाखवली होती. झीनत अमानने देव आनंदच्या बहिणीची भूमिका केली होती. चित्रपटातील “फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है’ गाणे आज सर्रास ऐकायला मिळते. “रेशम की डोरी’ चित्रपटातही शंकर जयकिशन यांनी एक अत्यंत मधुर असे गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात दिलेले आहे. “बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है’ हे गाणे लोकप्रियतेत वरच्या क्रमांकावर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
“जाने तू या जाने ना’ या चित्रपटात अदिती (जेनेलिया डिसूझा) आणि अमित (प्रतीक बब्बर) यांच्यातील टॉम अँड जेरी सारखीच नोक-झोक आजही अनेकांच्या लक्षात आहे. ते एकमेकांशी कसे भांडतात आणि कशा पद्धतीने प्रेम करतात, हे पाहणं मनोरंजक आहे. त्या दोघांचं नातं हे सिद्ध करतं की जरी तुम्ही एकमेकांशी कितीही भांडत असलात तरीही तुम्ही एकमेकांच्या नेहमीच पाठीशी राहू शकता. “दिल धडकने दो’ या चित्रपटात कबीर (रणवीर सिंग) आणि आयशा (प्रियांका चोप्रा) यांची बहीण-भावाची जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. त्यांच्यातील केमिस्ट्रीही हटके होती. त्यांना एकमेकांकडून मिळालेल्या बळामुळेच त्यांना त्यांच्या पालकांसमोर आणि जगासमोर उभे राहता आले. दिल धडकने दो प्रमाणे, कपूर अँड सन्समध्ये देखील आपल्याला अशीच बहीण-भावाची कथा पाहायला मिळते.
“रक्षाबंधन’ चित्रपटामध्ये आपल्या चार बहिणींची जबाबदारी असलेला भाऊ अर्थात अभिनेता अक्षयकुमार आपल्या बहिणींचे पालन पोषण कशापद्धतीने करतो या संघर्षाची आणि त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमाची कहाणी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. श्रेयस तळपदेने “इक्बाल’ चित्रपटात श्वेता बसूच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात दोघांचे खास नाते दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये लहान बहीण आपल्या भावाला प्रेरणा देते जेणेकरून तो क्रिकेटमध्ये पुढे जाऊ शकेल आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकेल.
बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांची प्रमुख भूमिका असलेला “जोश’ चित्रपट 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला.
या चित्रपटात जुळे भाऊ-बहीण दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात दोघांची जोडी अशी आहे की, ते एकमेकांसोबत खूपच मजा मस्ती करतात आणि मित्रांसारखे राहतात. सुशात सिंह राजपूत याची मुख्य भूमिका असलेला “काई पो चे’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. जरी हा चित्रपट मैत्रीवर केंद्रित असला तरी यात बहीण आणि भावाच्या प्रेमाचे अतूट नाते दाखवण्यात आले आहे. अमृता पुरीने या चित्रपटात बहिणीची जबरदस्त भूमिका साकारली आहे. बॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट म्हणजे “हम साथ साथ है’. हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्यावरच तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात सलमान खान, सैफ अली खान, मोहनीश बहल आणि नीलम ही भावंडं दाखवली आहेत. या चित्रपटात बहीण-भावाचं जबरदस्त नातं दाखवण्यात आलं आहे.
“धर्मात्मा’ या चित्रपटात रक्षाबंधनचे एक दृश्य आहे. बहिणीच्या पतीने आपल्या वडिलांचा खून केल्याची माहिती जेव्हा फिरोज खानला होते तेव्हा तो रागात आणि सूड घेण्यासाठी तिच्या घरी जातो. तेव्हा बहीण (फरिदा जलाल) त्याला राखी बांधते, पतीसाठी विनंती करते. “सनम बेवफा’ या चित्रपटात एक मुलगी आपल्या मैत्रिणीच्या पाच भावांना राखी बांधते. यात हिंदू-मुस्लिमांतील प्रेमाचे नाते दाखविले आहे.
“फिजा’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि करिश्मा कपूर भाऊ-बहिणीच्या भूमिकेत आहेत. दंगलीत फिजाचा भाऊ अमान कशा पद्धतीने गायब होतो. शेवटी बहिणीचे प्रेम जिंकते. ती आपल्या भावाला शोधते आणि त्याला घरी आणते, अशी या चित्रपटाची कथा आहे. “माय ब्रदर निखिल’ चित्रपटात जुही चावलाने एड्स पीडित भावाच्या मदतीसाठी लढणाऱ्या महिलेची भूमिका साकारली आहे. ती त्याच्यासाठी पूर्ण जगाशी लढते. आयुष्यातील शेवटचे दिवस त्याला सुखात जगता यावेत म्हणून ती लोकांशीही भांडते.
चित्रपटांसोबतच “चम्बल की कसम’ चित्रपटातील “चंदा रे मेरे भईया से कहना’, “तिरंगा’ चित्रपटातील “इसे समझो ना रेशम का तार’, “बेईमान’ चित्रपटातील “ये राखी बंधन है ऐसा’, “प्यारी बहना’ चित्रपटातील “राखी के दिन’, “हम साथ साथ हैं’ चित्रपटातील “छोटे-छोटे भाइयों के’, “सच्चा झूठा’ चित्रपटातील “मेरी प्यारी बहनीया बनेगी दुल्हनियां’, “रिश्ता कागज का’ चित्रपटातील “ये राखी की लाज तेरा भईया निभायेगा’ ही भाऊ-बहिणीच्या प्रेमावरील गाणीही अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत.भाऊ-बहिणीच्या प्रेमाची महती सांगणारी ही चित्रपटातील गाणी ऐकून आपला रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित होईल.