कापूरहोळ- कापूरहोळ-भोर रस्त्यावर रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागोजागी चर न काढल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असल्यामुळे चालकांना वाहन चालविताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भोर-कापूरहोळ मार्गावर कासुर्डी येथील दत्त मंदिर ते नेकलेस पॉईट मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील पाणी गटारात उतरण्यासाठी कोणतीही उपाय योजना केली नाही. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटाराची डागडुजी केली नाही. आळंदे गावात जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याला मुख्य मार्ग जोडताना मोरी बांधलेली नाही. यामुळे कासुर्डी, आळंदेवाडी जोड रस्त्याचे पाणी भोर-कापूरहोळ मार्गावर येत आहे. कापूरहोळ परिसरात अनेक ठिकाणी धोकादायक झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे भोरचे सहाय्यक अभियंता आर. एल. ठाणगे म्हणाले की, कापूरहोळ-भोर मार्गावरील पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.तसेच आळंदेवाडी, कासुर्डी गावच्या रस्त्याची कामे भोर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करताना संबंधित ठेकोदाराने जोडरस्त्याला मोऱ्या बांधलेल्या नाहीत.