वाल्हे- गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. प्रशांत आंधळे यांनी दिली.
मागील आठवड्यांमध्ये वाल्हे व परिसरातील दोन जणांना डेंगूची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र व वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी जाऊन पाणी साठ्याची तपासणी करण्यात आली. तसेच जंतूनाशक पावडर टाकण्यात आली आहे.
प्रशासनाच्या वतीने घरोघरी जनजागृती करून त्यांना डेंगू, चिकनगुण्या, मलेरिया व अन्य आजारांवरील माहिती पत्रक वाटण्यात आल्याची माहिती डॉ. आंधळे यांनी दिली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आशा व मदतनीस काम करीत आहेत. वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या इंधन विहिरीमध्ये टीसीएल टाकण्यात आले आहे. परिसरातील पावसाने वाढलेल्या गवतावर औषध तसेच धुराची फवारणी करण्यात आल्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र व वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी केले आहे.