नगर- डीसीपीएस धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या पहिल्या हप्त्याची माहिती व रक्कम मिळण्याची मागणी जुनी पेन्शन हक्क कृती समिती च्या वतीने करण्यात आली. ही मागणी संदर्भात कृती समितीच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले.
यावेळी आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, सुनिल दानवे, भाऊसाहेब जिवडे, देवीदास पालवे, मंगेश काळे, अंबादास मिसाळ, विनोद घोरपडे, सुभाष भागवत, सतीश शिंदे, रुपेश पसपुल आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील डीसीपीएस (1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाच्या धोरणानुसार सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता रोखीने मिळणार होता. यासाठी शाळांनी वेतन पथकाकडे बिले देखील सादर केलेली होती. जिल्ह्यातील काही शाळांमधील कर्मचारी यांना सदर सातव्या वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता मिळाला आहे. परंतु अनेक शाळांनी नोव्हेंबर 2019 मध्ये बिल सादर करूनही सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता मिळाला नाही.
तसेच माध्यमिक डीसीपीएस धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आजपर्यंत कपातीचा कुठलाही हिशोब पावती देण्यात आली नसल्याचा आरोप जुनी पेन्शन हक्क कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
तसेच सर्व विभागातील डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांना कपातीच्या पावत्या, हिशोब दिला जातो व ऑनलाइन पाहता येतो. फक्त माध्यमिक डीसीपीएस धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आज पर्यंत कपातीचा कुठलाही हिशोब व पावती का दिली जात नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.