काळदरी- शिंदेवाडी येथील प्रेम नवनाथ शिंदे याने तायक्वोंदो स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. ही स्पर्धा साउथ कोरिया गव्हंजू युनिव्हर्सिटीतर्फे घेण्यात आली होती.
या स्पर्धेत दक्षिण कोरिया, चीन, अमेरिका, सिंगापूर, थायलंड,
इंडोनिया, केनिया, भारत अशा 11 देशांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा फाईट व फुमसे या दोन प्रकारात घेण्यात आल्या. यामध्ये भारतातील 72 जणांचा संघ दक्षिण कोरियामध्ये गेला होता. पुरंदर तालुक्यातील सासवडमधील गुरुकुल विद्या मंदिरचा विद्यार्थी कुमार प्रेम नवनाथ शिंदे हा श्रीलक्ष्य तायक्वोंदो असोसिएशनतर्फे या स्पर्धेत सहभागी झाला होता.
सासवड येथील प्रशिक्षक किरण गायकवाड व माधुरी गायकवाड यांनी त्यास मार्गदर्शन केले. त्याने फुमसे प्रकारात 14 वर्षांखालील गटात नेत्रदीपक कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. प्रेम याचे वडील नवनाथ शिंदे हे भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत तर आई राणी शिंदे गृहिणी आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे मांढरचे सरपंच सचिन शिंदे यांनी प्रेम याचे अभिनंदन केले.