सनसिटी रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार
पुणे : सिंहगड रस्त्याकडून सनसिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी लवकरच फुटणार आहे. या मार्गावर शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरीपर्यंतचा रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा देण्याची प्राथमिक तयारी जागा मालकांकडून दर्शविण्यात आली असल्याची माहिती नगरसेविका मंजूषा नागपूरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ही जागा येत्या काही दिवसांत ताब्यात मिळणार असून त्यानंतर तातडीने काम सुरू करण्यात येणार असल्याचे नागपूरे यांनी स्पष्ट केले. दीपक नागपूरे यावेळी उपस्थित होते.
सनसिटीकडे जाणारा हा रस्ता सुरू होताच रस्त्याच्या भूसंपादनाची जागा ताब्यात नसल्याने अरूंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन नागपूरे यांनी पुढाकार घेत या जागेचे मालक माजी नगरसेवक शैलेश चरवड तसेच हर्षल चरवड यांच्याशी चर्चा करून महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच या वेळी रस्त्याची गरज व्यक्त केली. ही बाब लक्षात घेत या दोन्ही मालकांनी तातडीनं त्यास सहमती दर्शवित जागा ताब्यात देण्यास मान्यता दिली असल्याचे नागपूरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ही जागा सुमारे 20 गुंठे असून ही जागा ताब्यात येताच अंदाजपत्रकातील निधीतून तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे नागपूरे यांनी स्पष्ट केले. तसेच या कामासह सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळया उपाय योजना करण्यात येत असून पुढील काही दिवसात ही कामे पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.