वडार बोली साहित्य संमेलन 2019 रविवारी पुण्यात
पुणे – अखिल भारतीय वडार बोली साहित्य परिषदेच्यावतीने वडार समाजाचे पहिले साहित्य संमेलन दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे कला रंगमंदिर, येरवडा येथे आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय वडार बोली साहित्य परिषदेचे टी. एस. चव्हाण, संयोजन समितीचे अध्यक्ष अशोक पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ पवार, विजय चौघुले, अशोक देवकर, भरत विटकर आदींनी संमेलनाचे नियोजन केले आहे. संमेलनाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून वडार समाजाचे युवा नेते नितीन धोत्रे उपस्थित राहणार आहेत. वडार समाजाच्या साहित्य संमेलानाचा पाच सत्रात कार्यक्रम होणार आहे. सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासोबतच कविसंमेलन, कथाकथन, परिसंवाद असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती समाजाच्यावतीने गोविंदा गुंजाळकर यांनी दिली. साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी एक आकर्षण असणार आहे. त्यात आकर्षक खिलारी बैल जोडी सोलापूर येथील मोहोळ येथून आणणार आहेत. त्यासोबतच खास वडार वाद्ये, फालका, शावल, दुमुल, आठा आणि अवजारेसह मिरवणूक असणार आहे.