रांची – झारखंड येथील काँग्रेस-जेएमएम-राजद आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा येत्या २९ डिसेंबर रोजी पार पडणार असून देशभरातील भाजप विरोधी पक्षांची नेतेमंडळी या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत. अशातच आता शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थिती दर्शवणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून भाजपसोबत काडीमोड घेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत महाआघाडी स्थापन करत सरकार स्थापन केले आहे.
झारखंडमध्ये शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चास मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे मुख्यमंत्री पदाची माळ हेमंत सोरेन यांच्या गळ्यात पडणार असल्याचे नक्की आहे. दरम्यान, हेमंत सोरेन यांनी आज एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, पी चिदंबरम, सपाचे अखिलेश यादव, आरजेडीचे तेजस्वी यादव हे देखील उपस्थिती लावणार आहेत.
Former President Pranab Mukherjee, Rahul Gandhi,Priyanka Gandhi Vadra, P Chidambaram, SP’s Akhilesh Ydaav,RJD’s Tejaswi Yadav,Maharashtra CM Uddhav Thackeray,WB CM Mamata Banerjee&Delhi CM Arvind Kejriwal among those attending oath ceremony of Jharkhand CM designate Hemant Soren. pic.twitter.com/emBG7c7Epd
— ANI (@ANI) December 27, 2019