- सार्वजनिक गर्दीची ठिकाणेही ओस
- अनेक भागांत अघोषित कर्फ्यु
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात “करोना’ रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन, नागरिक चिंतेत आहेत. दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिक आता खबरदारी घेत आहेत. आज रविवार सुटीचा दिवस असतानाही नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडणे टाळले असल्याचे दिसून आले. त्यामुळे, नेहमीच गर्दीने गजबजलेल्या चौकांत आणि मुख्य रस्त्यांवरही आज रविवार असूनही दिवसभर शुकशुकाट दिसून आला. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने शहरात अनेक ठिकाणी स्वयंघोषित कर्फ्यु लागल्याची स्थिती होती.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या आता 8 वर गेली आहे. मागील चार दिवसांपासून संशयित व बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे, गर्दीच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या अज्ञात व्यक्तींकडून करोना व्हायरसचा नकळत प्रसार होऊ शकतो. ही बाब टाळण्यासाठी शहरातील गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच शासनानेही कामाव्यतिरिक्त गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. शासनाच्या या आवाहनाला विविध स्तरातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे. आज रविवारी असतानाही शहरातील विविध मॉलमध्ये गर्दी दिसून आली नाही.
सुटीच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील मॉल्स आणि चित्रपटगृहांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी असते. शहरात हिंजवडी, तळवडे येथील आयटी कंपनीतील कामगारांना शनिवार, रविवार सुटी असल्याने शहरात ठिकठिकाणी यांची गर्दी असते. परंतु करोना व्हायरसच्या भीतीमुळे आज मॉलमध्येही शुकशुकाट जाणवत होता.
गर्दीच्या ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे करोना सारखा संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असल्यामुळे पिंपरी मार्केट, सिटी मॉल्स, ब्रॅण्ड फॅक्टरी, एल्प्रो सिटी स्क्वेर मॉल, यासह विविध चौकांमध्ये आज विशेष गर्दी दिसून आली नाही. नागरिक घराबाहेर पडलेले नसल्यामुळे रस्तेही ओस पडले होते. जुना मुंबई-पुणे महामार्गावर दिसणाऱ्या तुरळक गर्दी व्यतिरीक्त शहरातील लिंकरोड तसेच इतर रस्त्यांवर वाहतूक ठप्प असल्याचे दिसत होते.