- फळे, भाजीपाला मार्केट स्थिर
- चिंचवडचा आठवडी बाजारही सुरूच
पिंपरी – करोनामुळे संपूर्ण देश भयभीत झाला आहे. सर्वच घटकांवर त्याचा गंभीर परिणाम झालेला आहे. मात्र, शहरातील भाजीपाला आणि फळ मार्केटला याचा अद्याप फटका बसलेला दिसत नाही. नागरिकांची मूलभूत गरज अन्नाची आहे. त्यामुळे नागरिक भाजीमंडईत भाजीखरेदीसाठी गर्दी करत आहेत. शिवाय थेरगाव येथे रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारही सुरळीत पार पडल्याचे दिसून आले. सर्व घटकांवर परिणाम होत असताना भाजीमंडई आणि फळ मार्केटमध्ये येणाऱ्या भाज्यांची आवकही सरासरीएवढी कायम असल्याने भाजी आणि फळ मार्केटमध्ये सध्या तरी “करोना इफेक्ट’ दिसून येत नाही.
करोना विषाणूमुळे मागील दोन दिवसांपासून शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरात तर करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दोन्ही शहरांत नाकाबंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शहरात होणाऱ्या आवक-जावकवर झालेला आहे. शहरात गरज असेल तरच यावे असे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे एकूणच व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, या परिस्थितीचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहरातील भाजी मार्केटमध्ये झालेला दिसत नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात भाजीपाल्याचा पुरवठा होणाऱ्या मोशी येथील उपबाजार समितीमध्येही सरासरीएवढी भाजीपाल्याची आवक सुरू आहे. तसेच पुणे येथून येणाऱ्या भाजीपाल्यावरही फारसा परिणाम झालेला नाही.
तसेच शहरातील भाजीमंडईमध्ये होणारी गर्दीही कायम असून, नागरिक भाजीपाला खरेदीसाठी मास्क लावून तसेच आवश्यक ती खबरदारी घेऊन घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी येथील भाजीमंडईमध्ये आज रविवारी सकाळी भाजी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारनंतर ही गर्दी कमी झालेली असली तरी त्याचा विक्रीवर फारसा परिणाम झालेला नसल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे, शहरात सर्वत्र “करोना इफेक्ट’ दिसत असताना भाजी मंडईमध्ये मात्र “नो करोना’ ची स्थिती दिसून आली.
डांगे चौकातील आठवडा बाजारही सुरूच
प्रशासनाने सिनेमागृह, शाळा, तसेच उद्यान बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच गावोगावच्या जत्रा, यात्राही करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्या आहेत. त्यामुळे थेरगाव येथील डांगे चौकात भरणारा आठवडा बाजार भरणार का? याबाबत नागरिकांमध्ये साशंकता होती. मात्र, आज रविवारी सकाळपासून नियमित वेळेत आठवडी बाजाराला प्रारंभ झाला. शिवाय भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे, भाजीमंडईप्रमाणे आठवडा बाजारावरही कोरानाचा इफेक्ट दिसून आला नाही.
दूध विक्रीवरही परिणाम नाही
पिंपरी-चिंचवड शहरात पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून दुधाची आयत होत असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या होणाऱ्या आयातीवर परिणाम झालेला नसून, शहरात नियमतपणे दुधाची आयात होत आहे. ग्रामीण भागात खासगी दूध संघाचे दूध संकलन सुरळीत सुरू असल्यामुळे सध्या तरी शहरात पुरवठा होणाऱ्या दुधावर काहीही परिणाम झालेला नाही.