- शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा आरोप
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील एक चांगला परिसर म्हणून वाकड, ताथवडे, पुनावळे विकसित होत असताना या ठिकाणच्या कामांना महापौरांनी केलेला विरोध दुर्दैवी आहे. महापौर या शहराच्या असून त्यांनी विकासकामांना पाठिंबा देण्याऐवजी सुरू केलेला विरोध हा त्या कोणाच्या तरी हातचे बाहुले बनल्यामुळे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे.
शिवसेनेचे गटनेते कलाटे यांच्या प्रभाग क्रमांक 25 मधील रस्त्यांच्या कामांना महापौर माई ढोरे यांनी विरोध केल्यानंतर कलाटे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून महापौरांवर चांगलीच टीका केली आहे. कलाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापौर या एका विशिष्ट नेत्याच्या हातचे बाहुले बनल्या आहेत. त्या शहराच्या आहेत की भाजपाच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाकड-पुनावळे-ताथवडे येथील कामांना विरोध करणाऱ्या महापौर करोनाचा संदर्भ देऊन विरोध करत आहेत. मग इतर प्रभागातील विकासकामांना त्या विरोध करतील का? असा प्रश्नही कलाटे यांनी उपस्थित केला आहे.
मोशी येथील सफारी पार्कवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे. तर चऱ्होली, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या परिसरातही विकासकामे सुरू आहेत त्याला महापौरांचा विरोध आहे का ते त्यांनी जाहीर करावे. एका बाजूला आपल्या प्रभागातील कामांसाठी इतर प्रभागातील तरतूद वर्ग करायची आणि इतर ठिकाणच्या कामांना विरोध करणे ही बाब दुर्दैवी आहे, असेही कलाटे यांनी म्हटले आहे. कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून एखाद्या प्रभागात विरोध करण्याऐवजी शहरातील करोना रोखण्यात अपयशी ठरलेल्या महापौरांनी शहरवासीयांच्या जीवाची काळजी घ्यावी, असा खोचक सल्लाही कलाटे यांनी महापौरांना दिला आहे.
आयुक्तांनी कोट्यवधी रुपये लाटण्याची संधी दिली
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या तीन वर्षांत भाजपाच्या काही ठराविक नेत्यांना महापालिकेच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपये लाटण्याची संधी दिली त्या वेळी आयुक्त सत्ताधाऱ्यांना चांगले वाटत होते. आता हेच आयुक्त आमच्या प्रभागात कामे करू लागल्याने सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचारी वाटत असल्याचा आरोप कलाटे यांनी केला आहे. त्यामुळे आयुक्तांनी गेल्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराला आणि काही ठराविक नेत्यांना कोट्यवधी रुपये मिळवून देण्यासाठी खतपाणी घातल्याचा प्रकारही समोर आला आहे.