केंदूर (प्रतिनिधी) – मुखई (ता. शिरूर) येथील काळभैरवनाथ मंदीरात दि. १९ रोजी मंदिरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन चोरट्यांनी मंदिराच्या पुजाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. तो संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
काळभैरवनाथ मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे मंदिराच्या पाठीमागून आलेल्या तीन चोरट्यांनी मिळून मंदिराच्या दरवाजात झोपलेल्या पुजाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवला. परंतु मंदिरात झोपलेल्या पुजाऱ्याच्या मुलाला याची चाहूल लागली आणि मुलगा बाहेर येऊ लागल्याने या तीनही चोरट्यांनी मंदिरातून धूम ठोकली. हा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1338506599822375/
तीनही चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसून येत असल्याने पोलिसांना तपास करणे सोयीस्कर होणार आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यावेळी मंदिरातील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते मात्र त्याचा तपास करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही.
त्यामुळे मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. आता तरी या चोरट्यांचा शोध लागला पाहिजे अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.