मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी 3 टक्क्यापर्यंत कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य एकाच दिवसात 3.95 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. गेल्या सहा दिवसात याच कारणामुळे गुंतवणूकदारांचे 11.31 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
16 सप्टेंबर पासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2,749 अंकांनी कोसळला आहे. आज बाजारातील विक्रीचा जोर इतका जास्त होता की, सर्वच क्षेत्राचे निर्देशांक कोसळले. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, वाहन, धातू, रिऍल्टी, बॅंकिंग क्षेत्राचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप गुरुवारी 2.28 टक्क्यांनी कोसळले.
जगभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अमेरिकेची अर्थव्यवस्था अतिशय कमकुवत झाली असल्याचे म्हटल्यानंतर अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले.
अर्थव्यवस्था कमकुवत होत असताना निर्देशांक मात्र वाढत असल्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली असतानाच आज शेअर बाजारात मोठी विक्री झाल्याचे दिसून आले. जोपर्यंत करोना व्हायरसची लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता असल्याचे ब्रोकर्स आणि विश्लेषकांनी सांगितले.
रुपयाचे मूल्यही कोसळले
शेअर बाजारात जोरदार विक्री होऊन निर्देशांक कोसळल्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही झाला. चलन बाजारांमध्ये आज रुपयाचे मूल्य 32 पैशांनी कोसळले.आज रुपयाचा भाव प्रति डॉलरला 73 रुपये 89 पैसे या पातळीवर गेला. शेअर बाजारातील या घडामोडीमुळे क्रुडचे दरही घसरले.