- तब्बल 1400 कोटींची कामे अडविली?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपातील अंतर्गत वादाचा फटका स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडीगेरी यांना बसला आहे. अंतर्गत बंडाळी करत अडवणूक केल्यामुळे तब्बल 1400 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्याची संधी असतानाही ही कामे अडविण्यात आल्याचे समोर आले आहे. तर हा वाद नव्या अध्यक्षांच्या पथ्यावर पडला असून, पहिल्या महिना दोन महिन्यांमध्ये स्थायीच्या विषयपत्रिकेवर ही कामे येणार असून, नव्या अध्यक्षांचे “भले’ होणार आहे.
महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपा पदाधिकारी आणि नगरसेवकांमधील मतभेद नेहमीच चव्हाट्यात आले आहेत. एकमेकांना मदत करण्याऐवजी दुसऱ्याचे नुकसान करण्यावरच अनेकांना स्वारस्य असल्याचेही समोर आले आहे. स्थायीचे अध्यक्ष विलास मडीगेरी यांची 29 फेब्रुवारी रोजी मुदत संपुष्टात आली. तर त्यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा 28 फेब्रुवारी रोजी झाली. या सभेसमोर पाणीपुरवठ्याचे सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या विषयांसह यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाईला मान्यता देणारा तब्बल 745 कोटी रुपयांचा विषय आणण्यासाठी महिनाभर पालिका वर्तुळात खलबते सुरू होती.
तर मडीगेरी हे देखील वरील दोन विषयांसह काही विषय समितीसमोर मंजुरीसाठी यावेत यासाठी प्रयत्नशील होते. मात्र भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा फटका त्यांना बसला. काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याच्या विषयासह यांत्रिकीकरणाद्वारे सफाईच्या विषयाला तांत्रिक मुद्दे उपस्थित करत “खो’ घातल्याने हे विषय प्रशासकीय पातळीवरच थांबले. शेवटची सभा रात्री अकरा वाजेपर्यंत चालविण्यात आली. मात्र अपेक्षित विषय न आल्याचे सर्वांचाच भ्रमनिरास झाला.
नव्या अध्यक्षांचा फायदा
या वादाचा फटका विलास मडिगेरी यांना बसला असला तरी 6 मार्चनंतर होणाऱ्या स्थायीच्या अध्यक्षांचा मात्र फायदा होणार आहे. जुन्या समितीने “कष्ट’ घेऊन तयार केलेले तब्बल 1400 कोटी रुपयांचे आयते विषय मंजुरीसाठी स्थायीसमोर येणार आहे. हे विषय सरळ-सरळ मंजूर होणार की आता या विषयात आडकाठी घालण्यासाठी भाजपाचा दुसरा गट कार्यरत होणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.