“अ’, “ब’ क्षेत्रीय विभाग “करोनामुक्त’; “फ’ विभागात सर्वाधिक 30 रूग्ण
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा “अ’ आणि “ब’ क्षेत्रीय विभाग करोनामुक्त आहे. तर, “फ’ विभागात सर्वाधिक 30 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरामध्ये 30 मार्चपर्यंत केवळ 12 रुग्ण होते. त्यानंतर मात्र रुग्ण वाढत गेले. एप्रिल महिन्यात सुरुवातीला 10 दिवसांमध्ये रुग्ण दुपटीने वाढले. त्यानंतर 7 दिवसाने आणि त्यानंतर 11 दिवसाने रुग्ण दुप्पट होण्याचा वेग राहिला आहे. शहरामध्ये आता 20 परिसर असे आहेत, ज्यांना महापालिका प्रशासनाने कंटेनमेंट झोन जाहीर केले आहे.
शहरातील काही भागांमधील रुग्ण बरे होऊन घरी परतत असल्याने आणि तिथे नवीन रुग्ण आढळत नसल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु काही भागांमध्ये मात्र सातत्याने रुग्ण आढळत असून, काही नवीन परिसरातून रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाचा ताण वाढत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचे प्रमाणही वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणाही सुटकेचा नि:श्वास सोडत आहे.
शहरात असा वाढला “करोना’
शहरामध्ये 11 मार्चला प्रथम 3 करोनाबाधित रुग्ण आढळले. 19 मार्चपर्यंत 12 रुग्ण होते. 30 मार्चपर्यंत एकही रुग्ण वाढला नाही. मात्र, 31 मार्चपासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. दिल्लीतल्या मरकजमधील संपर्कातून शहरात करोनाचे बाधित रुग्ण वाढत गेले. 30 एप्रिलपर्यंत असलेले 12 रुग्ण 9 एप्रिलला 24 झाले होते. म्हणजे दहा दिवसांमध्ये दुप्पट रुग्ण झाले. त्यानंतर, 16 एप्रिलला 51 रुग्ण संख्या होती. म्हणजे केवळ सात दिवसांमध्ये दुपटीहून आधिक रुग्ण वाढले. त्यानंतर 11 दिवसांनी म्हणजे 27 एप्रिलला 103 करोनाबाधित रुग्ण होते. तर, गेल्या 5 दिवसांमध्ये शनिवारी सायंकाळपर्यत हाती आलेल्या माहितीनुसार 12 नवीन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हा आकडा 115 पर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यामध्ये 71 पुरुष आणि 44 महिला रुग्ण आहेत. बाधित 115 रुग्णांपैकी आत्तापर्यंत शहरातील तिघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर, शहराबाहेरील 2 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, 52 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
सध्या असलेले विभागनिहाय करोनाबधित रुग्ण :
“अ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत (आकुर्डी) : एकही रुग्ण नाही. “ब’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत (मामुर्डी, किवळे, रावेत) : एकही रुग्ण नाही.
“क’ विभाग (चिखली व मोशीचा काही भाग, भोसरी, पिंपरी) : 3 रुग्ण.
“ड’ विभाग (पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे निलख, रक्षक सोसायटी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवचा काही भाग) : 10 रुग्ण.
“इ’ विभाग (डुडुळगाव, चऱ्होली, मोशीचा काही भाग, दिघी, बोपखेल) : 6 रुग्ण.
“फ’ विभाग (तळवडे, निगडी, चिखलीचा काही भाग) : 30 रुग्ण.
“ग’ विभाग (थेरगाव, रहाटणी) : 5 रुग्ण
“ह’ विभाग (दापोडी, सांगवी, औंध रुग्णालय, पिंपळे गुरवचा काही भाग) : 6 रुग्ण
लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे
करोनाची कोणतीही लक्षणे नसताना शहरामध्ये करोना “पॉझिटिव्ह’ आलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 52 करोनाबाधित रुग्णांना करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. 5 रुग्णांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळली. तर, 3 रुग्ण सध्या कृत्रिम श्वासोच्छवासावर आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.