- स्वच्छता जनजागृतीसाठी केलेल्या खरेदीमुळे आयुक्तांकडून सक्त ताकीद
पिंपरी – स्वच्छता अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेली खरेदी “कारणे दाखवा’ नोटीसचे कारण बनली होती. परंतु या खरेदीस “स्थायी’ने मान्यता दिल्यामुळे पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची “सक्त ताकीद’वर सुटका झाली आहे. स्वच्छता अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी टोपी, टी-शर्ट आणि महिलांसाठी ऍप्रन, ट्रॅकसूट थेट पद्धतीने खरेदी करण्यात आले होते. थेट पद्धतीने खरेदी करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यासह सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला आयुक्तांनी सक्तताकीद दिली आहे.
महापालिका “अ’ क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे आणि सहायक आरोग्याधिकारी महादेव शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत महापालिका हद्दीतील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि स्वच्छतेबाबत प्रचार व प्रसार व्हावा यासाठी जनजागृती अभियान व र्स्स्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी टोपी, टी-शर्ट तसेच महिलांना अप्रॅन, ट्रॅकसूट देण्यात आले. या साहित्याची खरेदी व निविदा प्रक्रिया राबवून करणे अपेक्षित होते. मात्र “अ’ क्षेत्रीय अधिकारी दुरगुडे यांनी दोन लाख रुपये किंमतीच्या साहित्याची खरेदी थेट पद्धतीने केली. ही बाब निदर्शनास आल्याने दुरगुडे आणि सहाय्यक आरोग्याधिकारी शिंदे यांना 18 नोंव्हेबर 2019 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
नोटीसच्या उत्तरादाखल अधिकाऱ्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचा निष्कर्ष आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे. परंतु या साहित्य खरेदीस स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. हे विचारात घेऊन दोघांनाही एक संधी देण्यात आली आहे. त्यानुसार दुरगुडे व शिंदे यांना आयुक्तांना सक्त ताकीद दिली आहे. तसेच यापुढे कामात कसूर केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.