प्रहार संघटना बसणार उपोषणास
जामखेड (प्रतिनिधी) –ग्रामीण भागातील खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा मिळण्यासाठी मंजूर झालेल्या जामखेड येथील क्रीडा संकुलाचे व बॅडमिंटन हॉलचे काम पुन्हा निधीअभावी रखडले आहे. त्यामुळे सदरचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा प्रहार संघटनेने मंगळवारपासून (दि.11) उपोषण करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळण्यासाठी तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. शासनाने 2003 मध्ये सोयीसुविधांसाठी 25 लाख रुपयांचा निधी जिल्ह्यातील क्रीडा संकुलांना दिला होता. त्यानंतर 2009 मध्ये हा निधी एक कोटी रुपये करण्यात आला होता. त्या अनुशंगाने जामखेड येथील भुतवडा रस्त्याजवळील पाण्याच्या टाकी शेजारील असलेल्या क्रीडा संकुलाला शासनाच्या वतीने सन 2011-12 साली म्हणजे आठ वर्षांपूर्वी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र संबंधित ठेकेदाराकडून येथील कामांच्या निधीसंबंधी भाववाढ करण्यात यावी, या कारणावरून सदरचे काम बंद पडले. त्यावेळी एक कोटी रुपयांच्या निधीतून चारशे मीटरचा प्लॉट व वॉल कंपाउंड असे 35 लाख रुपयांची कामे करण्यात आली होती. 65 लाख रुपयांची कामे शिल्लक राहिली होती.
मागील दोन वर्षांपूर्वी जामखेड येथे क्रीडा प्रेमी व सूर्योदय ग्रुपच्या वतीने क्रीडा संकुलाचे काम सुरू व्हावे, अशी मागणी लावून धरल्यानंतर या ठिकाणी बॅडमिंटन, टेबल टेनिस हॉलच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. यामध्ये बेसमेंट व विटांच्या भिंती पर्यंतचे काम सुरू झाले होते. मात्र पुन्हा हे काम निधी अभावी रखडले. क्रीडा संकुलाचे व बॅडमिंटन हॉलचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, यासाठी आता जामखेड येथील प्रहार संघटनेने उडी घेतली असून, जामखेड येथील क्रीडासंकुलमध्ये अपूर्ण असलेल्या बॅडमिंटन हॉल इतर सर्व कामे त्वरित चालू करण्यात यावे, यासाठी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, कार्याध्यक्ष भीमराव पाटील, गणेश हगवणे, राहुल पवार व सूर्योदय ग्रुपच्या सदस्य यांनी निवेदन दिले. तसेच येत्या 11 फेब्रुवारीपर्यंत हे काम सुरू न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.