एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष : विश्रामगृहात सोयीसुविधांची वानवा
माजी परिवहन मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली
पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) वल्लभनगर आगारातील विश्रामगृहात विश्रांती घेणाऱ्या चालक-वाहकांचे सोयी सुविधांअभावी मोठे हाल होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगनगरी असल्याने येथे प्रवाशांची मोठी संख्या आहे. त्यामुळे राज्यभरातील विविध भागांतील आगाराच्या गाड्या वल्लभनगर आगारात मुक्कामी असतात. मात्र, येथील अपुऱ्या व्यवस्थेमुळे दिवसभर थकुन-भागून आलेल्या चालक-वाहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वल्लभनगर आगारातील विश्रामगृहात रात्री व दिवसा विश्रांती घेण्यासाठी कायम जवळपास दोनशे चालक-वाहक असतात. मात्र, येथील सुविधांअभावी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्यावर्षी रोटरी क्लबच्या वतीने मोठा गाजावाजा करत विश्रामगृहाची डागडुजी करून विश्रामगृहाच्या उद्घाटनासाठी खुद्द तात्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना बोलावले होते. उद्घाटन प्रसंगी येथील खाटावर गादी नसल्याबाबत रावते यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मात्र, याबाबत रोटरी आणि एसटी प्रशासन या दोघांनी सुद्धा केराची टोपली दाखवली आहे. गेल्या वर्षभरापासून आगारातील विश्रामगृहात दुमजली खाटा टाकण्यात आल्या आहेत. मात्र, या खाटावर गाद्या नसल्याने चालक-वाहकांना रात्री झोपण्यास अडचणी येत आहेत. विश्रामगृहात सुविधांअभावी झोप मिळत नसल्याने चालक वैतागले आहेत. विश्रामगृहातील सुविधांमध्ये कधी सुधारणा करणार असा प्रश्न चालक वाहक उपस्थित करत आहेत.