पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार

प्रधानमंत्री किसान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
नगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरू असून, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यामध्ये 6 लाख 9 हजार 741 शेतकरी पीएम किसान योजने अंतर्गत लाभार्थी असून वेगवेगळ्या वित्तीय संस्था व बॅंकाकडून यापैकी 3 लाख 51 हजार 714 लाभार्थी शेतकऱ्यांना पिककर्ज पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यंत्रणांना दिले आहेत. तसेच पीएम किसान योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बॅंकाकडून पीककर्ज घेतलेले नाही अशा शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोणत्याही वित्तीय संस्था तसेच बॅंकाकडून पीक कर्ज न घेतलेले 2 लाख 58 हजार 27 पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी जिल्ह्यामध्ये शिल्लक आहेत. या शेतकऱ्यांना बॅंकिंग क्षेत्रापासून पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी संदीप वालावलकर नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक शीलकुमार जगताप तसेच कृषी अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून, संबंधितांना विशेष मोहिमेचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्व बॅंक शाखांना यासंदर्भात कळविण्यात यावे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही, अशा पद्धतीने कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश दिले.

या शेतकऱ्यांना सुटसुटित रित्या अर्ज करता यावा यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बॅकांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. लाभर्थी शेतकऱ्यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसलेबाबतचे घोषणपत्र घेऊन ज्या बॅकेतून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे, तेथे संपर्क साधावा. कोणत्याही बॅंक अथवा वित्तीय संस्था येथे पिक कर्ज नसणाऱ्या पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च हा बॅंकाकडून माफ करण्यात येणार आहे.

परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांना बॅंकामार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजने अंतर्गत पीक कर्ज उपलबध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पावतळीवर विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बॅंकांना सर्वतोपरी सहकार्य करावे अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.