देहुरोड – पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या एक लाख दहा हजार रुपये किंमतीचा 9 दुचाकी चोरट्याकडून जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यातील एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली तर त्याचा एक अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
सनी उमेश पै (वय 21, रा. सांगवडे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
देहुरोड गुन्हे प्रकटीकरणाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस नाईक प्रशांत पवार व पोलीस कर्मचारी किशोर परदेशी यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गज्जेवार, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस नाईक पवार, प्रमोद उगले, मयूर जगदाळे, पोलीस शिपाई सचिन शेजाळ, विजय गेंगजे, सुमीत मोरे, संकेत घारे, विकी खोमणे आदींनी सापळा रचून दुचाकी चोराला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून सहा दुचाकी व त्याच्या अल्पवयीन साथीदाराकडून तीन दुचाकी असे एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देहुरोड 2, हिंजवडी 1, निगडी 1, राजगड 1 असे अनुक्रमे पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आली आहे.