- “वर्क फ्रॉम होम’ ः कंपन्यांना अतिरिक्त खर्च
पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून “करोना’च्या भीतीने “वर्क फ्रॉम होम’ची चर्चा वाढली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम सुरु झाले आहे. शहरातील पिंपळे सौदागर, नवी सांगवी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, चिंचवड, पिंपळे निलख, वाकड या परिसरांमध्ये राहत असलेल्या आयटी व इतर कार्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी आता घरातच ऑफिस उघडले आहे. पहिल्यांदाच शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात “वर्क फ्रॉम होम’ कल्चर दिसून येत आहे.
उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिपंरी-चिंचवड शहरात शेकडोंच्या संख्येने आयटी व इतर कार्पोरेट कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. पर्यायाने काही उपनगरांमध्ये बहुतेक घरांमध्ये ऑफिसच्या कामांना सुरुवात झाली आहे. सोमवारपासून वर्क फ्रॉम होमची मोठ्या प्रमाणात तयारी सुरु झाली होती. प्रत्येक कंपनीचे स्वतःचे सॉफ्टवेयर असते. हे सॉफ्टवेयर लॅपटॉपमध्ये अपलोड करुन देत किंवा कंपनीच्या मेन सर्व्हरला लॅपटॉप ऍटेच करुन कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या कामासाठी सर्व कंपन्यातील आयटी आणि इडीपी विभाग तास न तास राबत होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरु होते. त्यानंतर बुधवारी बहुतेक घरांमध्ये काम सुरु झाले.
दरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप, इंटरनेटसाठी डोंगल, पॅन ड्राइव्ह देण्यासाठी कंपन्यांना अतिरिक्त खर्च येत आहेत. खूपच मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने लॅपटॉपचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही आयटी कंपन्यांनी आपल्या काही कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करुन दिले परंतु सर्वांना देणे शक्य नसल्याने डेस्कटॉप घरी घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. “करोना’मुळे “वर्क फ्रॉम होम’चा अतिरिक्त खर्च कंपन्यांना सोसावा लागत आहे.
एकाच छताखाली दोन कंपन्यांची कामे
आयटीयन्स आणि बड्या कंपन्यांतील प्रोफेशनल्स शहरातील काही उपनगरांमध्ये राहण्यास प्राधान्य देतात. पती-पत्नी दोघेही प्रोफेशनल्स असतात. त्यामुळे शहरातील अनेक घरांमध्ये एकाच छताखाली दोन वेगवेगळ्या कंपन्यांची कामे होताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी संयुक्त कुटुंब असलेल्या घरांमध्ये दोनपेक्षा अधिक कंपन्यांची कामे होताना दिसत आहेत.
आई-बाबा घरीच पण वेळ नाही
चिमुकल्यांसाठी आई-बाबांच्या “वर्क फ्रॉम होम’चा अनुभव काहीसा वेगळा आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळांनाही सुट्टी असल्यामुळे मुलेही घरात आहेत. आता आई-बाबा देखील घरात आहेत. परंतु घरातही ते कामात गुंतले असल्याने आई-बाबा घरी असल्याचा आनंद व्यक्त करायचा की ते वेळ देत नसल्याचा आणि बाहेर फिरायला घेऊन जात नसल्याचे रुसायचे अशा संभ्रमात लहान मुले आहेत.