- विमा योजनेसाठी 5 कोटी वर्गीकरण
- “धन्वंतरी’मुळे चार वर्षांत 61 कोटींचा खर्च
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच सेवानिवृत्तांना देखील लागू असलेल्या धन्वंतरी स्वास्थ योजनेपोटी महापालिका प्रशासनाने चार वर्षांत 60 कोटी 91 लाख रुपये मोजले आहेत. ही आरोग्य योजना महागडी ठरत असल्याने ती फेब्रुवारी 2019 मध्ये बंद करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला आरोग्य वीमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यासाठी वैद्यकीय मुख्य कार्यालयाच्या स्थायी आस्थापनेतून 5 कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती. या नवीन वैद्यकीय धोरणांतर्गत 1 सप्टेंबर 2015 पासून महापालिका कर्मचाऱ्यांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली. महापालिका सेवेतील सुमारे साडे सात हजार कर्मचारी तसेच नंतर या योजनेत महापालिका सेवेतील शिक्षकांना देखील सामावून घेण्यात आले. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांनादेखील ही योजना ऐच्छिक पद्धतीने लागू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून 300 रुपयांची कपात केली जात होती. तर सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिकाऱ्याच्या वेतनातून दरमहा 150 रुपये कपात केली जात होती. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच 18 वर्षाखालील दोन पाल्यांना घेता येत असे. मात्र या योजनेवर अधिक खर्च होत असल्याचे कारण देत वैद्यकीय विभागाने ती योजना बंद करून खासगी कंपनीकडून विमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला.
फेब्रवारी महिन्यात झालेल्या सभेत त्याला मंजुरी देण्यात आली. नवीन योजनेसाठी 2019-20 या अर्थिक वर्षात 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र धन्वंतरी योजनेतील प्रलंबित बिले अदा करण्यासाठी तरतूद कमी पडत असल्याने वैद्यकीय विमा योजनेच्या 15 कोटीमधील 6 कोटी रुपयांचा निधी धन्वंतरी योजनेसाठी वर्ग करण्यात आला. त्यामुळे विमा योजनेसाठी 9 कोटींचा निधी शिल्लक आहे. विमा योजनेच्या प्रिमियमचा पहिला हप्ता अदा करण्यासाठी 5 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी वैद्यकीय मुख्य कार्यालयाकडील स्थायी अस्थापना या लेखाशिर्षातील 48 कोटींपैकी 5 कोटींचा निधी वर्ग करण्यात येणार आहे. या वर्गीकरणास मंजुरी देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या येत्या महासभेत ठेवण्यात आला आहे.
योजनेला कर्मचारी महासंघाचा विरोध
धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करून खासगी कंपनीची वैद्यकीय विमा योजना सुरु करण्यास पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाकडून विरोध केला जात आहे. ही नवीन विमा योजना लागू केली तर आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी महासंघाने दिला आहे.
सहा हजार रुग्णालयांध्ये उपचार उपलब्ध
प्रस्तावित आरोग्य वीमा योजनेत महाराष्ट्रबरोबरच परराज्यातील अशा एकूण सहा हजार रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार आहे. या योजनेअंतर्गत कर्मचारी व त्यांच्या पात्र कुटंब सदस्यांचा प्रतिवर्ष तीन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात येणार आहे. मात्र, आजारावरील उपचारांनुसार ही मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढविली जाणार आहे.