सुदैवाने चार वर्षांचा मुलागा बचावला
वडगाव मावळ – चार वर्षांच्या आजारी मुलाना रुग्णालयात घेऊन जाताना पुणे-लोणावळा लोकलखाली सापडून एका मूकबधिर महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत सुदैवाने 4 वर्षांच्या मुलाचा बचावला. कान्हे रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी (दि. 11) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
रेखा प्रकाश शेलार (वय 26, रा. बोरवली, आंदर मावळ, ता. मावळ) असे रेल्वेखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे, तर विराज प्रकाश शेलार (वय 4) असे अपघातात बचावलेल्या मुलाचे नाव आहे.
लोहमार्ग सहायक पोलीस फौजदार एल. जी. पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा शेलार व तिचा आजारी मुलगा विराज याला घेऊन बोरविली येथून कान्हे येथे खासगी रुग्णालयात निघाली होती. लोहमार्ग ओलांडताना कान्हे रेल्वे स्टेशनजवळ पुणे-लोणावळा रेल्वे लोकलखाली सापडून मूकबधिर महिला रेखा शेलार गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. शेलार यांचा 4 वर्षांचा मुलगा विराज सुदैवाने वाचला आहे.
घटनास्थळी सहायक पोलीस फौजदार एल. जी. पठाण आणि महिला कर्मचारी सिंधू मोहिते यांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. महिला मूकबधिर असल्याने रेल्वे लोकल वाहनाचा हॉर्न ऐकू न आल्याने हा अपघात झाला, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
मयत महिला रेखा शेलार हिचा पतीही मूकबधिर आहे. घराची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. आजारी मुलाला वैद्यकीय उपचार देण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जात असताना हा अपघात झाला. या आईचा मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.