मंचर- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणाला मंचर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अल्पवयीन मुलीस आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव स्वप्नील भिकाजी गुंजाळ (वय 20, रा. पिंपरखेड, ता. शिरुर) आहे. निरगुडसर येथील अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याबाबत संबंधित मुलीच्या आईने मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास करण्यात आला. मोबाइल लोकेशनद्वारे मुलगी जालना येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस कर्मचारी सागर गायकवाड व मोनिका राक्षे यांनी मुलीची जालाना येथून सुटका केली. तसेच आरोपीस अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे करीत आहेत.