पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाकडून धाडसत्र सुरू आहे. भाजपकडून सूडाच्या राजकरणापोटी हा प्रकार केला जात असल्याची टिका करत शहर राष्ट्रवादीकडून शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. भाजप नेत्यांकडून केवळ आरोप करून सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून या प्रकरणी उपमुख्यमंत्री पवार यांना लक्ष करण्यात येत असून महाराष्ट्रतील जनता या प्रकरणी भाजपला जागा दाखवून देईल अशी टिकाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
नारीशक्तीच्या सन्मान करण्याचे पवित्र पर्व असलेल्या नवरात्र उत्सवामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या बहिनींच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी टाकून आयकर विभागा मार्फत भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्राच्या अस्मितेला आव्हान दिले आहे. भाजपच्या या हुकूमशाही राजवटीचा निषेध करत उपमुख्यमंत्र्याच्या समर्थनार्थ संपूर्ण पुणे शहरातून शहराध्यक्ष प्रशांत जगताप व युवक शहराध्यक्ष महेश हांडे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत.