कोल्हापूर(प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवासाठी माझी लाइटिंग यंदा का घेतली नाही, या किरकोळ कारणावरून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री करवीर तालुक्यात खेबवडे येथे घडली आहे. वैभव साताप्पा भोपळे (वय २५, रा. लोहार गल्ली,खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित हल्लेखोर सुरज सातापा पाटील (वय २५, रा. खेबवडे) हा शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खेबवडे येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातील शिवशंभु तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणारा नवरात्र उत्सव यंदा मात्र कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. मध्यवर्ती चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याऐवजी जवळच्याच एका मंगल कार्यालयात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री देवीची आरती झाल्यानंतर मंडळाचे सर्व कार्यकर्ते चौकात थांबले होते. यावेळी सुरज पाटील हा चौकात येऊन यंदा नवरात्र उत्सवासाठी माझी लाइटिंग का घेतली नाही, असा प्रश्न विचारून कार्यकर्त्यांसोबत वादावादी करू लागला.
यावर्षी कोरोनामुळे साध्या पद्धतीने नवरात्र महोत्सव होत असल्याने पुढील वर्षी पाहू, असे सांगून कार्यकर्त्यांनी सुरज याची समजूत काढायचा प्रयत्न केला तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या उत्सव सोहळ्यासाठी पुढाकार घेणारा वैभव भोपळे याच्याशी सुरजने हुज्जत घालण्यास सुरुवात केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. यावेळी संशयित सुरजने वैभव भोपळे याच्या अंगावर धावून जात धारदार चाकूने पोटावर वार केल्याने वैभव जमिनीवर कोसळला. वैभवला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले.
वैभवाचा खून झाल्याचे समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. नवरात्र काळात ही घटना घडल्याने खेबवडे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव, जिल्हा विशेष पथकाचे तानाजी सावंत, इस्पिर्लीचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा मध्यरात्रीच खेबवडे येथे दाखल झाला आहे.