सरकार कामगारांच्या संघटना मोडून काढत आहे

भोर येथील सभेत सुप्रिया सुळे यांचा आरोप

भोर- भोर, वेल्हा या भागात माथाडी कामगारांची संख्या लक्षणीय असून याच भागातील कामगारांमुळे मुंबई प्रगती पथावर आहे. पवार साहेब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने नेहमीच माथाडी कामगारांचा योग्य सन्मान केला आहे. त्यामुळेच शशिकांत शिंदे नावाच्या माथाडी कामगाराच्या मुलाला त्यांनी आमदारच नव्हे, तर मंत्री सुद्धा बनविले. आज, मात्र विद्यमान सरकारची वाटचाल माथाडींसह सर्वच कामगार संघटना मोडून काढण्याच्या मार्गाने सुरू आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भोर येथील जाहीर कार्यक्रमात विरोधकांचा समाचार घेतला.

पांडे येथील शिवमंगल मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस आणि मित्र पक्षातर्फे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. कामगार संघटना तयार करण्यासाठी 108 ही संख्या वाढवून हे सरकार 500 वर नेत आहे. याचा सरळ अर्थ असा होतो, की कोणत्याही कंपनीमध्ये युनियन तयार होणार नाहीत आणि युनियनच नसेल तर कोणालाही मनात येईल तेंव्हा कामावर ठेवा आणि मनात येईल तेंव्हा काढून टाका, असा हुकूमशाही कारभार या सरकारचा होणार आहे. हा आगामी काळातील संभाव्य धोकाही सुळे यांनी यावेळी लक्षात आणून दिला.

  • पवार घराण्यावर उगाचच टीका…
    जोपर्यंत पवारांवर टीका करत नाही, तोपर्यंत हेडलाईन होणार नाही, हे अखंड महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे जाणूनबुजून प्रकाशझोतात येण्यासाठी काही लोक पवार घराण्यावर उगाचच टीका करीत आहेत, या वक्तव्याचा पुनरुच्चार सुळे यांनी केला. त्या म्हणाल्या की, माझ्या कामाबाबत टीका करण्यासाठी विरोधकांकडे मुद्दाच नाही. त्यामुळेच वैयक्तिक टीका केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.