विरोधक खासदार माझ्या जवळपासही फिरकू शकत नाही

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील : आंबेगाव-शिरूर मतदारसंघात दौऱ्याला प्रतिसाद

कवठे – भीमाशंकर, अष्टविनायक गणपती देवस्थानांना जोडणारे रस्ते असो वा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून केलेला कवठे ते गांजवेवस्ती रस्ता असो. शिरुर लोकसभा मतदारसंघात मी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मंजूर करुन आणले. रात्रंदिवस जनतेच्या संपर्कात राहिलो. त्यामुळे माझ्यावर टीका करण्यासाठी विरोधकांकडे मुद्देच शिल्लक राहिले नाहीत, म्हणूनच नसलेले प्रश्‍न उपस्थित करुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. पण माझे त्यांना आव्हान आहे की, तुमच्या कुठल्याही खासदाराची कामगिरी आणि माझ्या कामांची तुलना करा. तुमचा एकही खासदार माझ्या जवळपासही फिरकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे अशा शब्दात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्त्यत्तर दिले.

खासदार आढळराव पाटील यांनी आज आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या शिरुर तालुक्‍यातील सविंदणे, मिडगूलवाडी, कवठे, मलठण, आमदाबाद, दुडेवाडी, निमगाव दुडे, रावडेवाडी, टाकळीहाजी, वडनेर, जांबूत, फाकटे, चांडोह, पिपरखेड आणि काठापूर आदी गावांचा जनसंपर्क दौरा केला. या दौऱ्याप्रसंगी कवठे येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.या दौऱ्यात त्यांचे ठिकठिकाणी हार, पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

सविंदणे गावातून सुरु झालेल्या दौऱ्यात शिवसेनेच्या नेत्या जयश्रीताई पलांडे, अरुण गिरे, सुरेश भोर, भाजपचे सावित्रा थोरात, बाळासाहेब लंघे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले, अनिल काशीद, तालुकाप्रमुख पोपट शेलार, दादा खर्डे, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, पाबळचे मा. सरपंच सोपान जाधव, कवठे गावचे मा. सरपंच बबनराव पोकळे, शिवाजी राजगुरु, बापुसाहेब शिंदे, संजय देशमुख, अतुल धुमाळ, मयूर थोरात, ज्ञानेश्‍वर घोडे, पाराभाऊ गावडे, किरण देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी देशाला स्वाभिमान मिळवून दिला. गोरगरीबांसाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या. सर्जिकल स्ट्राईक करुनपाकिस्तानला धडा शिकवला. जगभरात देशाची प्रतिमा उंचावली.देशातील जनतेने मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शिरुरच्या जनतेनेही या त्यांच्या जीवाभावाच्या शिवाजीदादाला चौथ्यांदा खासदार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर नी विजयाचा चौकार मारणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, अशा शब्दात खासदार आढळराव पाटील यांनी आपल्या विजयाचा विश्‍वास प्रकट केला. विकासकामांबाबत बोलताना खासदार आढळराव पाटील म्हणाले की, कवठे हे माझे हक्काचे व आवडते गाव असून पंतप्रधान ग्रामसडक योजना असो वा खासदार निधी असो. एकट्या कवठे गावात मी 22 विकासकामे केली आहेत. त्यामुळे विकासाच्या प्रश्‍नांवर माझ्यावर टीका करण्यासाठी विरोधकांकडे मुद्दाच शिल्लक नाही असेही ते म्हणाले.

या प्रसंगी शिवसेनेच्या नेत्या जयश्री पलांडे यांनीही राष्ट्रवादीचे स्थानिक नेते लाचार झाल्याची जहरी टीका करताना जनतेशी समरस झालेल्या आढळराव दादांचा विजय पक्का असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.