75.79 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुंबई: राज्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी आणि नागरिकांनादेखील या संदर्भात तक्रारी दाखल करण्यात याव्यात या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल (cVIGIL) हे मोबाईल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. या ॲपवर आतापर्यंत एकूण 1 हजार 862 तक्रारी नागरिकांकडून दाखल करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हास्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनी दिली.
निवडणुकीमध्ये मतदारांना निर्भय व मुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याअंतर्गत पोलीस, आयकर, अबकारी विभाग इत्यादी विभागांमार्फत निगराणी ठेवण्यात येत आहे. या विभागांनी आतापर्यंत 19.82 कोटी रुपये इतकी रोख रक्कम, 38.36 कोटी रुपये इतक्या किमतीचे सोने व इतर जवाहिर, 13.64 कोटी रुपये इतक्या किमतीची दारु, 3.96 कोटी रुपये इतक्या किमतीचे मादक पदार्थ याप्रमाणे एकूण 75.79 कोटी रुपये इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निवडणुकीचे काम आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि संबंधित कायदा व नियमांनुसार पार पाडण्यात येत आहे, हे पाहण्याकरिता आयोगाकडून प्रत्येक लोकसभा मतदार संघाकरिता विविध निरीक्षक नेमण्यात येत आहेत, अशीही माहिती श्री. मोहोड यांनी दिली.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात वर्धा मतदारसंघात 14, रामटेकमध्ये 16, नागपूरमध्ये 30, भंडारा-गोंदिया मध्ये 14, गडचिरोली-चिमूरमध्ये 5, चंद्रपूरमध्ये 13 तर यवतमाळ-वाशिममध्ये 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.