राजगुरूनगर बॅंकेला 30 कोटींचा ढोबळ नफा

अध्यक्ष गणेश थिगळे यांची माहिती : एनपी दोन टक्‍क्‍यांनी कमी

राजगुरूनगर- राजगुरूनगर सहकारी बॅंकेला 2018-19 या आर्थिक वर्षात तब्बल 30 कोटी ढोबळ नफा झाला असून अनुत्पादीत कर्जे (नॉन परफॉर्मिंग असेट (एनपी) 2 टक्‍क्‍यांनी कमी झाला असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजगुरुनगर सहकारी बॅंकेची मागील आर्थिक वर्षातील लेखाजोखासंदर्भात मंगळवारी (दि. 9) बॅंकेच्या राजगुरूनगर येथील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी उपाध्यक्ष सागर पाटोळे, ज्येष्ठ संचालक प्रताप आहेर, किरण आहेर, किरण मांजरे, राजेंद्र सांडभोर, राजेंद्र वाळूंज, परेश खांगटे, हेमलता टाकळकर, डी. के, गोरे, राहुल तांबे, दिनेश ओसवाल, सतीश नाईकरे, अरुण थिगळे, धनंजय कहाणे, के. डी. गारगोटे, बॅंकेचे व्यवस्थापक शांताराम वाकचौरे, कर्ज वसुली अधिकारी संजय ससाणे, अमृत टाकळकर उपस्थित होते.

गणेश थिगळे म्हणाले की, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे काम प्रगती पथाकडे जाणार आहे. समाजात एक नावाजलेली बॅंक म्हणून राजगुरुनगर सहकारी बॅंकेकडे पहिले जाते. 15 मे 2018 रोजी अध्यक्ष झाल्यानंतर वसुलीचे मोठे आव्हान समोर उभे होते. एनपी वाढलेला होता तो कमी करण्याचे मोठे आव्हान होते. वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष झाल्यानंतर एनपी कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते ते आज पूर्ण केले आहे. 11.40 टक्‍क्‍यांवरून बॅंकेचा एनपी 9.40 टक्‍यांवर आणला आहे. बॅंकेची थकीत कर्जे वसूल करण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, बॅंकेच्या हितासाठी कोणालाही कर्ज भरण्यात सवलत दिली नाही, त्यामुळे मोठी वसुली झाली. फेब्रुवारी-मार्च महिन्यात जोरदार वसुली सत्र सुरू केल्यामुळे एनपी कमी होत नफा वाढवला. बॅंक यशाकडे नेण्यासाठी कर्मचारी वर्गाची मोठी साथ मिळाल्याने हा टप्पा गाठता आला. यामुळे सभासदांना लाभांश देण्याची अडचण दूर झाली असून वार्षिक सभेत ठरल्याप्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे. सभासद कर्जदार यांच्या रोषाला सामोरे जात कर्ज वसुली केली. यामध्ये कर्जवसुलीचे प्रमुख सम्राट सुपेकर यांचे आणि त्यांच्या टीमचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. बॅंकेचे हित जोपासण्यासाठी कर्मचारी वर्गाचे मोठे प्रयत्न आहेत. संचालक मंडळाचा त्यासाठी पाठींबा असल्याने बॅंकेची प्रगतीचा आलेख उंचावत आहे. रिझर्व बॅंकेच्या अटी शर्ती बॅंकेने पूर्ण केल्याने लाभांश आणि नवीन शाखा, बॅंकेसाठी जागा खरेदी,आदि महत्वाच्या कामातील अडचणी दूर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • आतापर्यंतचा उच्चांकी नफा
    राजगुरुनगर सहकारी बॅंकेतील आतापर्यंतचा हा उच्चांकी नफा आहे. मागील वर्षी 24 कोटी 45 लाख रुपये ढोबळ नफा झाला होता. यावेळी त्यात वाढ होवून 30 कोटी रुपये ढोबळ नफा झाला आहे. ही बॅंकेच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. ठेवीमध्ये एक हजार कोटींचा टप्पा पार करीत बॅंकेत 1047 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर 674 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे, अशी एकूण 1721 कोटी रुपयांची उलाढाल करणारी ग्रामीण भागातील राजगुरूनगर सहकारी बॅंक एकमेव आहे. खेळते भांडवल 1230 कोटी 56 लाख रुपये आहे. बॅंकेचा एनपीए 11.40 वरून 9.40 टक्‍के म्हणजे सुमारे 2 टक्‍के कमी झाला आहे. दहा टक्‍क्‍यांच्या आत एनपीए आल्याने रिझर्व बॅंकेच्या अटी शर्ती कमी झाल्या असून सभासदांना लाभांश देण्याची अडचण दूर झाली आहे. बॅंकेत 32 हजार 422 सभासद संख्या झाली आहे.
  • कर्ज वसुली सुरुच राहणार
    राजगुरुनगर सहकारी बॅंकेची थकीत कर्ज वसुली मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. कोणाची मने दुखावण्याचा बॅंकेचा प्रयत्न नाही मात्र, घेतलेली कर्जे भरण्याची जबाबदारी संबंधित सभासदांची आहे. म्हणून थकीत कर्ज वसुली करताना कडक धोरण ठेवण्यात येणार आहे. यापुढेही कर्ज वसुली सुरू राहणार असल्याचे बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले.
  • दोन वर्षे आर्थिक मंदी असताना बॅंकेने मोठी प्रगती केली आहे. सहकार क्षेत्रात उत्तम काम करून कामाचा ठसा निर्माण केला आहे. एनपी कमी करून नफा वाढ केली आहे. कर्मचाऱ्यांचे योगदान व बॅंकेचा कारभार पारदर्शक आणि सभासदांचे हित जोपासणारा असल्याने प्रगतीचा आलेख दरवर्षी चढता आहे.
    – राजेंद्र सांडभोर, संचालक, राजगुरूनगर सहकारी बॅंक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.