मोदींनी आपल्या पंधरा उद्योगपती मित्रांसाठीच सत्ता राबवली – राहुल

कृष्णगिरी – पंतप्रधान मोदींनी आपल्या पंधरा उद्योगपती मित्रांसाठीच सरकार चालवले त्यांच्या हिताखेरीज त्यांनी अन्य काहीही पाहिले नाही अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बॅंकांना मोठ्या प्रमाणात फसवणारे विजय मल्ल्यासारखे उद्योगपती तुरूंगात का जाऊ शकले नाहीत असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. आज तामिळनाडुतील कृष्णगिरी येथील निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले की देशातील बॅंकांचे हजारो कोटी रूपये बुडवून अनेक जण विदेशात पळाले. त्यात नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या अनेकांचा समावेश आहे. पण त्या पैकी एकालाही तुरूंगात पाठवण्याची तत्परता मोदी सरकार दाखवू शकलेले नाही. ते म्हणाले की आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर एकाही शेतकऱ्याला कर्ज चुकवल्याच्या आरोपावरून कारागृहात जावे लागणार नाही. श्रीमंत लोक कर्ज बुडवून पळून जातात मग शेतकऱ्यांना जेल मध्ये का जावे लागावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अनिल अंबानी, मेहुल चोकसी, नीरव मोदी अशा मोजक्‍या पंधरा लोकांसाठीच नरेंद्र मोदींनी आपले सरकार चालवले असा आरोप त्यांनी केला. आपले सरकार सत्तेवर आल्यावर देशातील सर्व लोकांना आपण खरेदीची शक्ती देऊ त्या द्वारे देशातील ठप्प पडलेली अर्थव्यवस्था आपण पुन्हा मार्गावर आणू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तामिळनाडुतील टेक्‍सटाईल आणि सिल्क उद्योगही पुन्हा बहरू लागेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.