महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना आरेरावी

महावितरणच्या चुकीनंतरही विजजोड तोडले

सिंहगड्‌ रस्ता परिसरातील प्रकार

पुणे  : थकीत वीज बील प्रकरणी नागरिकांचे तसेच सोसायटयांची वीज मीटर काढून घेण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना आरेरावी केली जात असल्याचे प्रकार सिंहगड रस्ता परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. ही कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई बाबत विचारणा करणाऱ्या महिलांना आरेरावी केली जात असून पुन्हा नागरिकांना कार्यालयात बोलवून चूकीच्या पध्दतीने वागणूक दिली जात असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
आनंद नगर येथील एकता नगरी मधील राज अपार्टमेंटच्या कॉमन मीटरला मागील महिन्यात महावितरणकडून 0 रूपयांचे बील देण्यात आले होते. त्यानंतर आता अचानक 2000 हजार रूपयांचे बील देण्यात आले असून त्याची मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी हे बील सोसायटीला देण्यात आले. त्यामुळे बिलातील गडबड लक्षात घेऊन सोसायटीकडून महावितरणला अर्ज दिला जाणार असतानाच, शुक्रवारी सकाळी महावितरणचे पथक थकीत कारवाईसाठी सोसायटी मध्ये पोहचले त्यामुळे त्यावेळी या कर्मचाऱ्यांनी गुटखा खालेला होता. तसेच मीटरच्या ठिकाणीच त्यांच्यांकडून थुंकण्यात आले. त्यामुळे तिथे उभे असलेल्या महिलांनी त्यांना इथे थुंकू नका तसेच चुकीच्या पध्दतीने कारवाई करू नये याबाबत आम्ही अर्ज करत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांनी सुनावल्याने चिडलेल्या या कर्मचाऱ्यांनी महिलांनाही आरेरावीची भाषा केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण होते. त्यानंतर सोसायटी पैसे भरण्यास तयार असतानाही आता कार्यालयात साहेबांना भेटा असे सांगण्यात आले. त्यामुळे सोसायटीचे पदाधिकारी कार्यालयात गेले असता, त्यांनाही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून आरेरावीची भाषा वापरत सुनावण्यात आल्याचे काही नागरिकांकडून प्रभातशी बोलताना सांगण्यात आले.

महावितरणच्या चुकीचा नागारिकांना भूर्दंड
दरम्यान, महावितरणकडून सुरू असलेल्या चुकीच्या कारभाराचा फटका गेल्या काही महिन्यांपासून सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहेत. अनेक नागरिकांना नेहमी पेक्षा जादा बिले येत असून बिले तयार होण्याची तारीख प्रत्येक महिन्याची वीस तारीख असली तरी बील भरण्यास एक दोन दिवसांची मुदत शिल्लक असताना नागरिकांना बिले मिळत आहेत. अनेक नागारिकांच्या बिलांवर असलेले मीटरचे रिडींग तसेच बिलांवरील रिडींग मध्ये तफावत असल्याचे चित्र असून, नागरीक तक्रार अर्ज घेऊन गेल्यानंतर त्यांना आधी चूकीच्या पध्दतीने आलेले जादा बील भरण्यास सांगण्यात येते. मात्र, त्यानंतर त्यांच्या अर्जावर काय कारवाई केली, त्यांचे जादा आलेले बील कमी झाले किंवा नाही याची साधी कल्पनाही नागरिकांना देण्यात येत नसल्याने नागरिकांना आर्थिक भूर्दडही सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.