वॉशिंग्टन – रशियाकडून संरक्षण सामग्री घेण्याबाबत अमेरिकेचे निर्बंध असतानाही तुर्कीने रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्रे खरेदी केली आहेत. त्यामुळे तुर्कीवरही सध्या निर्बंधांची टांगती तलवार आहे. पण अद्याप त्या विषयीचा निर्णय घेण्यात आलेला नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तुर्कीच्या बाबतीत स्थिती अत्यंत अवघड बनली असून त्या अनुषंगाने काय उपायोजना करता येतील याची आम्ही तपासणी करीत आहोत पण त्यांच्यावर निर्बंध लागू करण्याच्या संबंधात अजून कोणताही निर्णय झालेला नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तुर्की अमेरिकेकडून एफ-35 लढाऊ विमाने खरेदी करणार होता. पण त्याच्या आधीच त्यांनी निर्बंध झुगारून रशियाकडून एस 400 क्षेपणास्त्र खरेदी केल्याने आता तुर्कीला ही लढाऊ विमाने द्यायची नाहीत असे अमेरिकेने ठरवले आहे.
भारतानेही रशियाकडून एस 400 क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतावरही अशीच कारवाई केली जाऊ शकते असे संकेत यातून मिळत आहेत. भारताला या व्यवहारातून अमेरिकेने सुट द्यावी अशी भारताची इच्छा असली तरी अमेरिकेने त्याविषयी आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. रशियाने युक्रेन मध्ये जो लष्करी हस्तक्षेप केला आहे त्यावरून अमेरिकेन रशियावर हे निर्बंध जारी केले आहेत.