भाजपला मतदान करण्यासाथी 900 कलाकारांचे आवाहन; विरोध करणाऱ्या 600 कलाकारांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला नागरिकांनी मतदान करावे, यासाठी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुमारे 900 कलाकारांनी आवाहन केले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत जसराज, अभिनेता विवेक ओबेरॉय आणि रिटा गांगुली यांचा समावेश आहे. या सर्व कलाकारांनी बुधवारी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. देशाला “मजबूत सरकार’ची आवश्‍यकता आहे, “मजबूर सरकार’ नको आहे, असे या कलाकारांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि दडपणाशिवाय नागरिकांनी मतदान करावे, असे या कलाकारांनी म्हटले आहे.

“देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हवे आहे. त्याबरोबर दहशतवादासारख्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला मजबूत सरकार हवे, मजबूर सरकार नको. त्यामुळे वर्तमान सरकारच कायम राहिले पाहिजे.’ असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये देशात भ्रष्टाचार मुक्‍त सरकार, सुशासन आणि विकासाभिमुख व्यवस्थापन होते, असेही या संयुक्‍त निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर गायक शंकर महादेवन, त्रिलोकी नाथ मिश्रा, अनुराधा पौडवाल आणि हंस राज हंस यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड आणि उषा गांगुली यांच्यासारख्या सुमारे 600 कलाकारांनी “भाजप आणि मित्र पक्षांना सत्तेतून बाहेर करावे.’ अशा आशयाचे आवाहन करणारे निवेदन प्रसिद्धीस दिले होते. देशाची प्रतिमा आणि राज्यघटनेला या सरकारमुळे धोका आहे, असे या कलाकारांनी म्हटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.