बारामतीची जागा भाजपने जिंकली तर राजकारण सोडेन

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आव्हान

बारामती- बारामतीची जागा भाजपने जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. पण, भाजपचा पराभव झाला तर त्यांनी निवृत्ती घ्यावी, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्र पक्षांच्या आघाडीला राज्यात चांगले यश मिळेल, मतदारांचा कौल आघाडीच्या बाजूने असून बारामतीतुनही सुप्रिया सुळे मताधिक्‍याने विजयी होतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

बारामती तालुक्‍यातील काटेवाडी येथे मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. भाजपने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामावर त्यांचा विश्वास होता तर अनेक मतदारसंघात त्यांनी उमेदवार का बदलले? असा सवाल पवार यांनी केला. त्यांना त्यांच्या कामगिरीवर विश्वास होता तर मग त्यांच्यावर राष्ट्रवादी व कॉंग्रेसकडून उमेदवार आयात करण्याची वेळ का आली, इतक्‍या फोडाफोडीचे व खालच्या पातळीवरील राजकारणाची अपेक्षा भाजपकडून निश्‍चित नव्हती. पण, त्यांनी तसं केले, असेही पवार म्हणाले.

मोदींनी या पूर्वीची निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविली होती, यंदा राज्यातील कोणत्याच सभेत त्यांनी विकासाचा मुद्दा काढला नाही, केवळ त्यांनी गांधी, नेहरु आणि पवार कुटुंबियांवर टीकाटीपण्णी केली. आम्ही मात्र देशाच्या विकासासाठी निवडणूक लढविण्यावर भर दिला आहे. भाजपने जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केली नाही आणि त्यावर पंतप्रधान किंवा त्यांची टीम काहीच बोलायला तयार नाही, त्यामुळे विरोधक म्हणून आम्ही भूमिका घेतली. भाजपच्या कितीतरी उमेदवारांनी आक्षेपार्ह विधाने केली. मारामारी झाली, काहींच्या डोळ्यात अश्रू आले तर काहींनी स्वतःला देव समजून घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, दुष्काळ, टंचाई, हमीभाव इतर विकासाच्या मुद्यावर ते काहीच बोलले नाहीत, हे दुर्देवी आहे. दोन टप्प्यातील मतदानानंतर राज्यातील हवा बदलली आहे, असे दिसते आहे, आम्हाला मताधिक्‍याचा विश्वास आहे. आमचे ऐक्‍य चांगले असल्याने यंदा यश चांगले मिळेल, काही ठिकाणी उशीर लागला आहे. मात्र, तरीही सर्वांनी एकदिलाने काम केल्याने आम्ही यंदा चांगले यश मिळवू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.