पात्रता नसलेल्या आ. गोरेंनी माझ्या नादाला लागू नये : डॉ. येळगावकर

सातारा.दि.29 (प्रतिनिधी)

“”माझ्यावर टीका करण्यापुर्वी तुमची पात्रता तपासा, तुमची अवस्था तर आता दुसऱ्याचे जोडे उचलण्याशिवाय पर्याय नसल्यासारखी झाली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी नवनिर्वाचित खासदारांच्या बुटाची धुळ चाटणारे तुम्ही शहाणपणाच्या गोष्टी आम्हाला शिकवण्याच्या पात्रतेचे तरी आहात का, असा सवाल माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आज आमदार जयकुमार गोरे यांना केला.

दोन दिवसापुर्वी खटावचे माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी साताऱ्यात आ. जयकुमार गोरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्याला उत्तर देताना आ. गोरेंनी येळगावकरांची पात्रता माझ्या बुटाजवळ असल्याचा घणाघात केला होता. गोरेंच्या टिकेने घायाळ झालेल्या येळगावकरांनीही त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी बाईलवेड्या आमदारांनी माझ्या नादाला लागू नये, असा इशारा दिला आहे. आजी माजी आमदारांच्या या शेलक्‍या टिकेमुळे माणचे राजकीय वातावरण पुरतेच ढवळून निघाले आहे.

“”चमको शेट, अख्खा सातारा जिल्हा तुम्हाला बाईलवेडा आमदार म्हणून ओळखतो, तुम्ही कशाला माझी पात्रता काढता, 10 वर्ष चमकोगिरीमध्ये घालवली. तुम्ही माढ्यात काढ्या केल्या, ज्या पक्षाने वाढवलं, तुम्हाला मोठ केलं, त्याच पक्षाचा पद्धतशीर कार्यक्रम करणारे तुम्ही पात्रता आणि उंचीच्या गोष्टी कशाला करता? असा सवालही येळगावकर यांनी उपस्थित केला.

निवडणुका जवळ आल्या की भुलथापांचा पाऊस पाडायचा, पाईपांचे सागांडे उभे करुन पाणी आणलं म्हणून सांगत तालुकाभर बरगड्या फासटून उभे राहिलेले फोटो बॅनरवर लावून हवा करण्यात तुमच्या दोन टर्म गेल्या आहेत,” अशी टीका त्यांनी केली. तुमच्यासारख्या खंडणीखोर माणसांनी स्वच्छ चारित्र्य असलेल्या माझ्याबद्दल बोलणं योग्य नाही, असा सल्ला येळगावकरांनी दिला.

माण खटाव जहागिरी असल्याचा कांगावा करून सगळे पोलींग एजंट फॉर्म आणि मतदारयाद्या स्वतःच्या बुडाखाली दाबून ठेवल्या आणि दुसऱ्याच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करता, तुम्ही नक्की लाज गहाण ठेवली तरी कुठे ? असा सवाल येळगावकरांनी केला. खासदारांना माझ्यामुळेच मताधिक्‍य मिळाल्याचे सांगणाऱ्या गोरेंची अवस्था बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्यासारखी झाल्याचा टोलाही येळगावकरांनी लगावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.