परिवहन मंत्र्यांच्या फोननंतर “डीसीं’ना आली जाग

विद्यार्थी पासचा प्रश्‍न ऐरणीवर; विद्यार्थी आक्रमक; प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन

सातारा, दि. 24 , प्रशांत जाधव
एसटीच्या भोंगळ काराभारामुळे सवलतीचे पास मिळणे बंद झाले असून जिल्ह्यातील सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची पासअभावी मोठी हेळसांड होत असताना एसटीचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वृत्त “डिजीटल प्रभात’च्या माध्यमातून समोर आल्यानंतर राज्याचे परिहवन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांना जाग आली. विद्यार्थी पासचा प्रश्‍न तात्काळ सोडवण्याचे आश्‍वासन विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी “प्रभात’ला दिले.

जिल्ह्यात या शैक्षणिक वर्षात सुमारे अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील पन्नास हजार विद्यार्थी एसटी पासचा वापर करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी आणि एसटीचा पास या दोन गोष्टी जिव्हाळ्याच्या आहेत. मात्र, सध्या एसटीकडून होत असलेली या विद्यार्थ्यांची पिळवणूक पाहता “”एसटी, नको रे बाबा” असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कारण सध्या जिल्ह्यात शाळेचा हंगाम सुरू झाल्याने सर्वत्रच एसटीचे पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग दिसून येते. पण याच विद्यार्थ्यांना गेल्या अनके दिवसांपासून शाळा सोडून एसटीच्या अधिकाऱ्यांची तोंडे बघत बसावे लागत आहे. कारण एसटीकडे पास काढण्यासाठी लागणारे फॉर्म उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी फॉर्म उपलब्ध झाले तर पास उपलब्ध नाहीत.

त्यामुळे विध्यार्थ्यांची कोंडी झाली आहत. पंधरा दिवसाहून अधिक काळ पास न मिळाल्याने दररोजच्या शालेय प्रवासासाठी विद्यार्थ्यांना पैसे देऊन पालक मेटाकुटीला आल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिक्षणासाठी दूरचा प्रवास करावा लागणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना एसटीच्या या भोंगळ कारभाराचा फटका बसला असून बस पास न दिल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थी व पालकांनी दिला आहे. विद्यार्थ्यांना पास काढताना काही ठिकाणी तर एका किमतीचा एक पास न देता त्याच किमतीचे दोन पास दिले जातात. म्हणजेच एका विद्यार्थ्याला देण्यात येणाऱ्या पासची किंमत सहाशे रुपये असल्यास चारशेचा एक व दोनशेचा एक असे दोन पास दिले जातात.

विद्यार्थी ते दोन्ही पास जवळ बाळगावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटीकडे एका किंमतीचे पास उपलब्ध नसल्याने एसटीने आडमुठेपणाची भूमिका घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

जिल्ह्यातील बहुतेक गावे व वाड्या या बस सेवेवरच विसंबून आहेत. ग्रामीण भागातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी जवळच्या शहरात ये-जा करत असतात. दरम्यान, पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच वेळ बस स्थानकातच थांबून राहावे लागत असल्याने शाळेत पोहोचण्यासाठी उशीर होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच पास वेळेत मिळत नसल्याने व तिकिटाचे दर पासपेक्षा अधिक असल्याने खिशाला झळ पोहचत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

विद्यार्थी संघटना कुठे आहेत
राज्यातील अनेक पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी विद्यार्थी हितासाठी अनेक विद्यार्थी संघटना स्थापन केल्या आहेत. या संघटना अनेकदा रस्त्यावरही उतरल्या आहेत. मात्र, सध्या जिल्ह्यात एसटी पासचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असतानाही या संघटनांनी काहीच ठोस भूमिका न घेतल्याने त्यांच्या हेतूवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

परिवहन मंत्र्यांची तत्परता
सातारा जिल्ह्यात पासअभावी विद्यार्थ्यांची होत असलेली हेळसांड “प्रभात’ने राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निदर्शनास आणली. त्यावेळी त्यांनी तात्काळ मंत्रालयातील अधिकाऱ्यांना नेमकी काय अडचण आहे, हे “प्रभात’कडून जाणून घ्या व त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर एसटीचे मुबंईतील वरिष्ठ अधिकारी
शैलेंद्र चव्हाण यांनी “प्रभात”कडून माहिती घेत साताऱ्याचे विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांना कारवाईचे आदेश दिले.

लवकरच प्रश्‍न मार्गी लागेल
डिजीटल प्रभात”ने बुधवारी सकाळी एसटी पासचा जिल्ह्यातील प्रश्‍न मांडला होता. त्यानंतर मंत्री महोदयांनी याची सविस्तर माहिती घेतली असून तातडीने हा प्रश्‍न सोडवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या स्मार्ट पासचे काम सुरू असल्याने काही प्रमाणात विद्यार्थ्यांना पास देताना अडचण निर्माण होत आहे. मात्र, लवकरच हा प्रश्‍न सोडवला जाईल.
– सागर पळसुले (विभागीय नियंत्रक, सातारा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)