दीड कोटींच्या विम्यासाठी स्वत:चा खून भासवून केला मित्राचा खून

बोधेवाडी घाटातील खुनाचे गूढ उलगडले; वाठार पोलिसांनी संशयिताला ठोकल्या बेड्या

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी)

मृत्यूनंतर मिळणारी विम्याची रक्कम मिळविण्यासाठी दुसऱ्या तरुणाचा खून करून आपलाच खून झाल्याचा बनाव करणाऱ्या संशयित सुमित सुरेश मोरे (रा. महिमानगड, ता. माण) या युवकाला वाठार पोलिसांनी अटक केली. या खुनाचे गुढ उकलल्यानंतर यानंतर भयानक सत्य समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले.

वाठार स्टेशन- बोधेवाडी ते डिस्कळ रस्त्यावरील पिराचा घाट परिसरात 21 जानेवारी रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्यांनतर वाठार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, वाठार, पुसेगाव व लोणंद पोलिसांनी संयुक्तिक तपास करुन त्या खुनाचे गुढ उकलले. त्यानंतर भयानक सत्य समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले होते.

स्वत:च्या खुनाचा बनाव करुन सुमित मोरे याने गावातीलच मित्राचा घात केल्याचे पुढे आले. संशयिताने त्याच्या गावातील सुनील बाबा आवळे (वय 31, रा. उकिर्डे, ता. माण) या तरुणाचा खून करून मृतदेहाला स्वत:चे कपडे घातले होते. तसेच खून केलेल्या तरुणाची ओळख पटू नये, म्हणून चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला होता.

तसेच स्वत: मृत झाल्याचा बनाव ठळक करण्यासाठी स्वतःकडील कारही मृतदेहासोबत जाळली होती. मात्र, वाठार पोलिसांनी या प्रकरणाचा छडा मोठ्या कौशल्याने लावत सुमित सुरेश मोरे याला याप्रकरणी अटक केली. बोधेवाडी (ता. कोरेगाव) परिसरातील पिराचा घाट येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मात्र, पोलिसांनी जळालेल्या कारच्या नंबरवरुन मृताची ओळख पटवली होती.

त्यानुसार मृतदेह सुमित मोरे याचा असावा, असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुमितच्या कुटुंबीयांशी बोलून तसेच तांत्रिक व गोपनीय तपासाच्या आधारे सुमित जिवंत असल्याचा शोध लावला. मृतदेह सुमितचा नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

तपासाचा केंद्रबिंदू सुमित याला केला होता. दरम्यानच्या काळात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांना सुमित जेजूरी (जि. पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्यातून स्वत:च्या खुनाचा बनाव उघड झाला.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली वाठारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, पुसेगावचे विश्‍वजीत घोडके, लोणंदचे संतोष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पाटील, तलवार, सहाय्यक फौजदार शंकर गुजर, हवालदार विलास यादव, नितीन भोसले, सचिन जगताप, तुषार आडके, उमेश गहीण, विजय खाडे, ज्ञानेश्‍वर यादव यांनी ही कारवाई केली.

देणी फेडण्यासाठीच घडला गुन्हा
संशयित सुमितने काही दिवसांपूर्वी प्रोटीन विक्रीचा व्यवसाय मुंबई येथे सुरु केला होता. मात्र, त्यात अपयश आल्याने त्याच्यावर लोकांची देणी झाली होती. ती फेडण्यासाठी त्याने भन्नाट कल्पना लढवत “आयसीआयसीआय’चा दीड कोटींचा विमा उतरवला होता. त्याचे पैसे मिळवण्यासाठीच त्याने स्वत:च्या खुनाचा बनाव करुन त्याच्यासारखा दिसणाऱ्या तानाजी आवळेचा खून केला.

Leave A Reply

Your email address will not be published.