दिल्लीतील चोरट्यांचा प्रताप; मोदींच्या पुतणीची पर्स लांबवली

नवी दिल्ली  -देशाची राजधानी दिल्लीत चोरटे किती मोकाट झाले आहेत याचा प्रत्यय देणारी घटना शनिवारी घडली. चोरट्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीला हिसका दाखवत त्यांची पर्स लांबवली. त्या पर्समध्ये सुमारे 50 हजारांची रोकड आणि 2 मोबाईल फोन होते.

पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या कन्या दमयंतीबेन सकाळच्या सुमारास अमृतसरहून दिल्लीत दाखल झाल्या. त्या उत्तर दिल्लीतील गुजराती समाज भवनसमोर रिक्षातून उतरत असताना स्कुटरवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याकडील पर्स हिसकावून नेली. त्या पर्समध्ये काही कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तूही होत्या. नंतर दमयंतीबेन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांची पर्स हिसकावण्यात आलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी केली. चोरट्यांची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्याचा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला.

दरम्यान, संबंधित घटनेवरून दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) मोदी सरकारवर निशाणा साधला. दिल्ली पोलीस मोदी सरकारच्या अखत्यारीत येत असल्याकडे आपने लक्ष वेधले. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती दिवसागणिक बिघडत आहे. भाजपच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा पाठलाग करताना दिल्ली पोलिसांकडून दाखवली जाणारी तत्परता दिल्लीकरांना सुरक्षा पुरवताना दिसत नाही, असे आपने म्हटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)