मंथन: सावट अद्यापही कायमच!

अ‍ॅड. प्रदीप उमाप

अलीकडेच राजधानी दिल्लीत पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने एका कॉल सेंटरवर छापा टाकला तेव्हा काही धक्‍कादायक बाबी निदर्शनास आल्या. या कॉल सेंटरच्या माध्यमातून आयव्हीएफ पद्धतीने महिलांना शंभर टक्‍के मुलगा होण्याची हमी दिली जात होती. यासाठी जोडप्याकडून भरभक्‍कम पैसा घेतला जात असे. आधुनिक आणि प्रगतशील समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण स्वत:ची टिमकी वाजवत असताना समाजातील काळा चेहरा यानिमित्ताने समोर आला आहे.

आजही समाजात मुलीच्या जन्माबाबत फारसे सकारात्मकतेने पाहिले जात नाही. महिला, युवतींनी कितीही प्रगती केली असली तरी आजही सुशिक्षित असो ग्रामीण भागातील कुटुंब असो मुलीच्या जन्मावरून नकारात्मक भावना निर्माण होते. सध्याच्या काळात मुलींना प्रत्येक पातळीवर मानहानी पत्करावी लागते आहे. एकीकडे मुलींना हार घातले जात आहेत, तर दुसरीकडे मुलगी असल्याने तिचा गळा घोटला जात आहे. एका समाजात दिसणारे दोन टोकाचे चित्र चिंतनीय आहे. मुलगी असल्याने कधी भ्रूणहत्या तर कधी त्यांना कचरा कुंडीत सोडून देणे यावरून समाजाची असंवेदनशील मानसिकता दिसून येते.

ज्या समाजात, वातावरणात मुलींना जन्म घेण्याचा अधिकार मिळत नाही, तेथे मानवी अधिकाराच्या चर्चेला अर्थ राहत नाही. आजही भारतीय समाज मनात मुलगा आणि मुलगी यात भेद केला जातो. म्हणूनच तर लिंग परीक्षण आणि भ्रुणहत्यासारख्या घटना कोठे ना कोठे उघडकीस येत असतात. देशात कडक कायदा असतानाही त्यातून पळवाटा काढल्या जात आहेत.

दिल्लीत एका कॉल सेंटरच्या मदतीने जोडप्यांना परदेशात पाठविले जात होते आणि तेथे गर्भलिंग चाचणी करण्याचा मार्ग नराधमांनी शोधून काढला होता. आयव्हीएफ सेंटरच्या माध्यमातून महिलांना मनाप्रमाणे अपत्य होण्यासाठी दुबई, सिंगापूर, थायलंड यासारख्या देशात पाठविले जात होते. कॉल सेंटरचे राष्ट्रीय पातळीवर जाळे पसरलेले होते आणि सुमारे शंभरांहून अधिक आयव्हीएफ केंद्र जोडले गेले होते. समाजात अनिष्ट रुढी आणि परंपरेचा पगडा आजही कायम आहे हेच यातून दिसून येते. लिंगभेद हा देशातील गंभीर आणि चिंतेचा विषय ठरलेला असताना कॉल सेंटरच्या मदतीने गर्भलिंग चाचणीसाठी आतापर्यंत सहा लाख जोडप्यांना परदेशात पाठविण्यात आले आहे.

आजही मुलगी नको ही मानसिकता समाजात असल्याने अशा प्रकारचे बेकायदेशीर धंदे फोफावले असल्याचे दिसून येते. आपला समाज हा विचार आणि व्यवहार असे दोन प्रकारच्या निकषात विभागला आहे. कथा आणि वास्तव यातील अंतरामुळे मुलींचे जीवन कष्टप्रद बनले आहे. परिणामी, पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचा विचार बाळगणाऱ्या आपल्या सामाजिक रचनेत कितीही बदल केला तरी काही गोष्टी अजूनही रुतलेल्या आहेत. काही काळापूर्वी युनिसेफच्या अहवालात पद्धतशीररित्या लिंगभेदामुळे भारतीय लोकसंख्येतून सुमारे पाच कोटी महिला आणि मुली बेपत्ता असल्याचे आढळून आले आहे.

बुरसटलेल्या विचारसरणीचे जोडपे किंवा कुंटुंब हे मुलगा हवा यासाठी परदेशात जाण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजतात. आजघडीला देशात सरासरी एक हजार मुलांमागे 943 मुली आहेत. अनेक प्रांतात तर यापेक्षा कमी सरासरी आहे. गेल्यावर्षीच्या निती आयोगाच्या अहवालानुसार देशातील 21 मोठ्या राज्यांपैकी 17 राज्यांत लिंगभेद मोठ्या प्रमाणात आहे. अहवालानुसार या काळात 17 राज्यांत लिंगभेदाचे प्रमाण दहा गुणांनी घसरले आहे. आरोग्यशिल राज्य, प्रगतीशिल भारतच्या अहवालानुसार 2015-16 या काळात गुजरातशिवाय हरियाणात स्त्री-पुरुष लिंगाच्या प्रमाणात खूपच घसरण झाली असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे निती आयोगाने देखील याबाबत चिंता व्यक्‍त केली असून त्यात सुधारणा आणण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. मुलींचे महत्त्व सर्व स्तरावर पटवून देणे काळाची गरज असल्याचे निती आयोगाने म्हटले आहे.

मुलगी असल्यास गर्भपात करण्याची कृती हा गंभीर गुन्हा असला तरी यावरून समाजातील विकृती लक्षात येते. लिंगभेदाचे असंतुलन हे अनेक आघाड्यावर चिंतेचा विषय आहे. अनेक भागात तर विवाहासाठी मुलांना मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. परराज्यातून मुली आणून विवाह केले जात आहे. एवढेच नाही तर मुला-मुलीत भेदभाव कायम असल्याने आजही दुर्गम आणि ग्र्रामीण भागात मुलींच्या शिक्षण आणि आरोग्याविषयी गोष्टींना महत्त्व दिले जात नाही. आपल्या समाजात कुपोषित मुलींची संख्या देखील लक्षणीय आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कौशल्याच्या बळावर मुली आघाडी घेत असताना त्या आजही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. प्रत्येक ठिकाणी श्रेष्ठत्व सिद्ध करूनही मुलींचा संघर्ष हा जन्मापासूनच सुरू असल्याचे दिसून येते.

जन्मापासूनच मुलींना दुय्यम स्थान दिले जाते. ही मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे. मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोनातही व्यापक बदल घडवून आणणे आवश्‍यक आहे. संकुचित मानसिकतेमुळेच मुली या आई वडिलांना ओझे वाटू लागतात. म्हणूनच मुलींच्या जन्माचे स्वागत करताना तिचा आदर, सन्मान करण्यासाठी व्यापक स्तरावर आणि सामूहिक सहभागातून जनजागृती करण्याची काळाची गरज आहे. मुलींशी निगडीत सर्व बाजूंवर जनजागृती झाल्यास “स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’चा शेवट गोड होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.